मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

पैसेंजरचा प्रवास पाच तासात

पैसेंजरचा प्रवास म्हणजे भलताच त्रासदायक हो. मी सहसा अश्या ट्रेनने कधी जायची हिम्मत करत नाही. परवा सोलापुर ते गुलबर्गा असा पैसेंजरने जायचा योग आला. 'फलकनुमा पैसेंजर' म्हणे त्या गाडीच नाव. हेदराबादला जाणारी ही गाड़ी भलतीच घाण असते, याची कल्पना अमु ने मला आधीच देवून ठेवली होती. कुठेही हात न् लावता सरळ आत जायच दरवाज्याला पण हात लावायचा नाही, भलतीच तारेवरची कसरत. टिकिट काढून चौकशी खिड़कीवरच्या त्या गोल आकाराच्या भोकातून आत डोकावलं. आजकाल खिड़की काचेची असते आणी त्यात उगाच चालणारा माइक वगेरे घेवून दात कोरत एखाद दुसरा बसलेला असतो, ह्या जागेवर बहुदा अर्धवट मुके बहिरे लोक बसवतात अशी माझी पक्की समजूत आहे. पहिल्यांदा विचारलेला प्रश्न त्याना आधी ऐकू जात नाही आणी त्यानंतर ते तोंडातल्या तोंडात काय बड्बड्तात ते आपल्याला कधी पहिल्यांदा ऐकू येत नाही त्यामुळे त्याना एकच प्रश्न दोनदा विचारावा लागतो आणी उत्तरेही दोनदा ऐकावी लागतात. दिवसभर आपण अखंड बडबड करतो अशी ह्यांची चुकीची समजूत असते. 'फलकनुमा पैसेंजर कब आएगी' ह्या प्रश्नाला 'लेट है' एवढच उत्तर मिळाल. 'कितनी लेट है' अस आपण पुन्हा विचारायच मग 'घंटा, आधा घंटा' असे शब्द कानावर येतात. 'कितने बजे आएगी' ह्या प्रश्नावर कोम्पुटर वर बटन आपटून 'ग्यारा बजे' असे शब्द निघाले. म्हणजे गाडीची निघण्याची वेळ होती पावणे अकराची आणी हा म्हणे अकराला येते ? मग निघते कधी ? खिड़की वर पुन्हा विचारणा झाली. दस बीस मिनिट में निकलेगी. चौकशी खिड़की वर चौकशी करून काही उपयोग नसतो. ' घंटा, आधा घंटा ', 'दस बीस मिनिट ' अशी मोघम उत्तरे ऐकून आपण धन्यता मानायाची आणी त्यात जो आकडा मोठा असतो ते खर उत्तर, आणी त्या उत्तरात आणखी काही मिनिट जोडून गाडीची वाट पहायची. घडाळ्या दहा वाजत होते. म्हटलं गाडीला तासभर अवकाश आहे तर सोलापुर फिरून यावं. रिक्श्याने रुजुता ज्या सोसायटीत आधी रहात होती तिथे पोहचलो. तिच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पूर्वीची जुनी माणसे भेटली.
पापभिरू माणसे आम्ही.. अकराला पाच मिनिटे अवकाश असताना पुन्हा स्टेशनवर आलो आणी गाडीची वाट पहाणं सुरु झालं. गणितात थोडी चुक झाली होती, काही मिनिटे जोडण्याऐवजी मी काही मिनिटे चुकून कमी केली होती. मला रेल्वेच गणित काय माहित. रेल्वेची अनओउंसमेंट ही आणखीन एक समस्या, रेल्वेचे हे गुण लालू पासून ममता पर्यंत ना कुणालाही बदलता आले, ना कधी येतील. सर्वात आधी ते भोंगे अश्या ठिकाणी लावतात की जेथून लोकांना काही ऐकुच जावू नये. एखाद वेळी कुहू कुहू करणारी कोकिळा दिसेल पण हे भोंगे काही दिसायचे नाहीत. नंतर त्यावरून सुरवातीला आणी शेवटी ऐकू येणारं ते टिंग टोंग सोडलं तर बाकी काही ऐकू येत नाही. कसली तरी अन्नौन्स्मेंट झाली आणी एक गाड़ी स्टेशन ला लागली. त्यावर लिहिल होतं ' बीजापुर-सोलापुर-गुलबर्गा-फलकनुमा-काचिगुडा पैसेंजर '. गाडीची अवस्था अमुने म्हटल्याप्रमाण... दरवाज्यावरच्या लोखंडी रौडला हात लावता आत चढलो. खिडकीतुन त्या बर्थवर रुमाल वगेरे टाकले. जागा अड़वल्या. गाड़ी इथून सुटणारी असल्याने रिकामी होती. सामान जागेवर गेलं. किती वाजता गाड़ी निघेल याची वाट पहाण, एवढच करता येतं होतं. अनेक लोक येवून गाड़ी कुठे जाते याची चौकशी आमच्याकडे करत होते. गुलबर्गा - हैदराबाद सांगुन त्याना परत पाठवत होतो. बीजापुर नहीं जाती ? असे प्रश्न अनेक बाणासारखे येत होते. तेंव्हा गुल्बर्ग्याची ढाल पुढे करत होतो. मी म्हटल, की इतके लोक अस का विचारताहेत बर ? गाडीवर तर स्पष्ट लिहिलय ती कुठे जाणार ते. अमुला म्हटलं, की जरा विचारून ये तर खरं.. टी सी ला, की काय भानगड आहे ते. शेवटी की गाड़ी बीजापुर पैसेंजर आहे फलकनुमा नाही. धावत उतरावं लागलं. उतरताना गुल्बर्ग्याची ढाल पाठीवर ठेवली आणी खाली माना घालून प्लेटफोर्म कड़े निघालो. फलकनुमा वर येणार होती. ' गाडी कुठल्या स्टेशनावर येणार ' हा नेहमी एक मोठा प्रश्न असतो. ह्या प्रश्नाच उत्तर ब्रम्ह्देवाला काय खुद्द ती गाडी चालवन्यारयाला पण शेवटच्या क्षणापर्यंत माहित नसतं. मुंबई ला सर्व जण प्लेटफोर्म ऐवजी पुलावर उभे रहातात आणी गाडी ज्या रुलावरून येइल त्या प्लेटफोर्म वर उतरतात इथे सुदैवाने तस काही घडल नाही. घडाळ्यात बारा वाजत आलेले आणी आमच्या गाडीचा काही पत्ता नव्हता. उद्यानएक्सप्रेस येवून गेली, बीजापुर पसेंजर स्टेशनावर लागलेली, नागरकोइल ची अनाउन्समेंट झालेली, आमची कुठेगायब झाली कोण जाणे. 'ती संध्याकाळची कोणार्क पण येवून जाइल तरी आपली येणार नाही', मी उगाचचरफडलो. जीने उतरताना लांबून गाड़ी येताना दिसली. पुन्हा तेच सीटवर रुमाल टाकणे, जागा अड्वणे, धक्के खात गाडीत चढ़णे हे प्रकार झाले. खिड़कीच्या जागा पटकावल्या. नागरकोइल एक्सप्रेस गेल्यावर हलेल गाड़ी - मी अंदाज लावत होतो. कुठून तरी धड धड ऐकू आली. मी म्हटल आली नागरकोइल. खिडकीतुन बाहेर बघितलं तर नुसतं इंजिन धडधड़त गेलं. आता पुन्हा धड धड ऐकू आली. म्हटलं नक्की नागरकोइल. कसल काय एक मालगाडी मुंगीच्या पावलाने चालत आली. आम्हा दिड-दमडीच्या माणसांपेक्ष्या तो करोडो रुपयांचा माल रेल्वेला जास्त प्रिय. साडे बाराची वेळ. नागरकोइल अखेर आली आणी प्रथम ती विजापुर पैसेंजर निघाली त्यानंतर कुठे आम्ही प्रवासाला लागलो. कुठे ते "ग्यारा" आणी कुठे साडे बारा. मघाशी ऐकताना आपली चुक नाही ना झाली अस उगीच वाटुन गेलं.
जोरदार येणा
ऱ्या एन्जिनाच्या शिट्टी ने कान किटले आणी काळा कुट्ट धुर नाकातोंडात गेला. आता लक्ष्यात आलंकी आम्ही बरोबर इन्जिना पासून दुसरया डब्यात होतो. ' झुक झुक झुक झुक अगिन गाडी, धुरांच्या रेषा हवेतकाढी ' गाण म्ह णावस वाटल पण त्या धुरामुळे आवाजच निघेना. इथे धुरांच्या रेषा नव्हत्या तर अनेक वलयेअसलेले मोठाले ढग होते. ह्स्तातल्या पावसाने सर्वत्र हिरवळ झाली होती. नद्या तुडुम्ब भरून वहात होत्या. शेतकरीभाताची शेती कापत होते. सूर्य ढगांच्या आत लपला होतां. मस्त वातावरण होतं, अधून मधून धुरांचे लोळ उठतहोते. गाडीत् कुठे बटाटवडे खा, कुठे मिर्ची भजी चाव आणी तिखट लागल्यावर पाणी..अस चालु होतं. खाता खाता हीगरम नाहीत अस म्हणुन पुन्हा दुसरया कडून तेच विकत घेणे अस करत प्रवास चालला होता.
टिकेकरवाड़ी पहिल ठिकाण, त्यानंतर होट्गी (१२.४०), तिलाठी (१२.५०), अक्कलकोट ( .००), नागसुर (.१५ ), बोरोटी ( .२५ ), दुधनी ( .४० ) करत कर्नाटकात प्रवेश केला. कुलाली (.५० ), गौड़गाव ( .०५ ), गाणगापुर ( .१० ), हुन्सीहडगीळ ( .२५ ), सावळगी ( .२० ), बबलाद ( .४० ) करत पावणेतिनला गुलबर्गा आलं. जस कुठेही हात लावता चढलो होतो तसच उतरलो. शिट्टी च्या आवाजाने कान जवळ पास बंद झालेले आणी धुर खावुन धाप लागलेली तरीही सुखरूप आणी फक्त तास उशिरा पोहचवल्या बद्दल रेल्वेचे मनोमन आभार मानले.

सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

हैदराबाद सेंट्रल, जागा : नूडल बार, वेळ : रात्रीचे आठ - साडेआठ.
मुख्य कलाकार : राहुल आणी रुजुता.
सहकलाकार : वेटर १ ला, वेटर २ रा, व 'चीनी'कम, सोबत काही पाहुणे कलाकार.
राहुल :चल आज आपण सिझलर खायच का ?
रुजुता :हो चाSलेSल. ( आवाज जरासा बोबडा, तोंडात पाणी आलेलं )
राहुल :ते बघ तिथे नूडल बार, जायच ?
रुजुता :हं चला ( आवंढा गिळून )
दोघांची पावल नूडलबार कडे वळतात , दारावर एक 'चीनी' कम स्वागत करते. मिचमिचे जपानी 'सुज'मट डोळे, उंची चार ते पाच फुट जेमतेम, दात ओठां वर बाहेर येवून आराम करत असलेले.
चीनीकम :ह्यांलो सर ,हँव मेन्नी पिपल ?
राहुल :( स्वगत - आंधळी बिंधळी आहे की काय, दिसत नाही , डोळे जास्तच मिचमिचे झाले वाटत ) वुए आर टू .
रुजुता :बापरे किती हो ही गर्दी.
चीनीकम :कम हीर शर ,शीट हीर.( एका टेबलाकडे अक्खा हात दाखवत )
अस म्हणून तिने मेनू कार्ड आणून देते. टेबलावरचे रुमाल दोघांवर टाकते.
राहुल :ह्या मेनू कार्डवर सिझलर दिसत नाहीय.
रुजुता :ह्या दुसरया मेनू कार्ड मध्ये आहे बघा. ( दुसरंच एक कार्ड फडफडवत )
राहुल :हो हो दिसल.
रुजुता :इथ थंडी वाजतेय हो खूप.
राहुल :ते ए सी च डक्ट आपल्या डोक्यावर आहे बरोब्बर, त्यामुळे वाजते थंडी
रुजुता :दूसरीकडे बसुयात का.
बाजूचे लोक पण उठून दूसरी कड़े जातात. एका कोपरयात जागा असते.
राहुल :तिथे थंडी नाही वाजत बहुतेक. ( कोपरयाकडे बोट दाखवत )
रुजुता :जावुया का तिथं.दोघेही टेबल सोडून कोपरयातल्या टेबलाकडे जातात, मेनुकार्ड सोबत घेवून.
राहुल :बोंल काय हवय तुला. ( मेनुकार्ड उघडून पाहात )
रुजुता :पनीर सिझलर, मागच्या वेळी खाल्ल होतं ना तेच. मस्त होतं.
राहुल :मी तर बुवा नॉन वेज खाणार ( चिडवून दाखवत )
रुजुता :वेटरला बोलवा ना भूक लागली. ( पोटा वरून उगाच हात फिरवत )
मग वेटरला बोलावण जातं, त्यांची नुसती धावपळ चालली आहे, त्यांच लक्ष्यच नाही आहे. शेवटी एकाला पकडून ऑर्डर दिली जाते. अर्धा तास झाला आहे पण जेवणाचा अजुन पत्ता नाही .आता तर बाजूच टेबल पण चिडलं आहे. त्याना पण येवून ४५ मिनिटे झालेली असतात.
टेबलावरची बाई : वुई गेव ऑर्डर इन् फाइव मिनिट एंड वेटिंग फॉर फोर्टी फाइव मिनिट, इफ यु डिड नोट ब्रिंग इन् फाइव मिनिट, वि विल लिव
वेटर २ रा : आय विल चेक, मैम.
टेबलावरचा माणूस :टेल मी इज इट रेडी और नॉट SS ? ( आवाजात एक प्रकारची चिड असते, डोळे लाल झालेले असतात )
वेटर १ ला : रेडी सर ( घाबरत )
तो लगेच जावून जेवण आणतो. टेबल समाधानाने जिंकल्याच्या आविर्भावात जेवण वाढून घेतं.
राहुल :छे बाबा, *@#// काय चाललय ह्यांच, किती वेळ ( टेबलावर असणार्या कागदावर पेंसिलिने रेघोट्या ओढत )
रुजुता :कंटाला आला बाई ( लांबलचक जांभई देत )
राहुल :आपण ज्या टेबलावर बसलो होतो ना तीथे नविन बसलेल्यांच जेवून पण झालं
रुजुता :अरे हो ख़रच की
राहुल :ते इथे कोपरयात लक्ष्यच देत नाहित, हेलो ,कितना टायम लगेगा यार ( वेटरच बखोट पकडून )
वेटर १ ला :सर बस दो मिनिट
रुजुता :त्याच्यासारख ओरडायला पाहीजे ( बाजुच्या टेबलाकडे डोळे करुन )
बाजुच्या टेबलावरच जेवण सम्पत आलं आहे .
राहुल :थांब त्याला बोलावतो, क्या चल रहा है ,हम जाए क्या ( वेटर कड़े रागाने पहात )
वेटर २ रा :सर हो गया.
तो आत जातो आणी नॉन वेज सिझलर आणतो .
रुजुता :शी बाबा ...
राहुल :घे तू टेस्ट कर थोडं.
रुजुता :त्याने दोन्ही एकदम आणायला पाहीजे होतं ना.
राहुल :येइल तुझ पण, थांब ना जरा.
रुजुता :मि काय तुमच्या तोंडाकडे पहात राहू.
राहुल :नूडल खा तो पर्यंत तू, मी आपला फोडी खातो ( उजव्या हाताचा अंगठा वर करून ).
रुजुता :बर ( स्वगत - पनीर येवू दे मग बघा )
नॉन वेज सिझलर आता संपत आलं आहे . इतकी भूक लागली आहे की ते तळच कोबिच करपट पान पण खावुन टाकलं आहे. तरी वेज सिझलरचा पत्ता नाही.
राहुल :अबे क्या हुआ कब आयेगा तुम्हारा ऑर्डर ( येराझारया घालत )
वेटर १ ला :सर अभीतक नही दिया आपको ?
राहुल :क्या यार मतलब, मजाक चल रहा है क्या ?
रुजुता :आता अजुन किती वेळ लागणार काय माहीत.
अजुन १० मिनिटे वाया जातात एकमेकांच्या तोंडाकडे पाहात.
राहुल :चल जावुया तुझ्या नशिबात पनीर नाही बहुतेक ( चेहर्यावर एक खट्याळ स्मितहास्य, राग लपवण्याचा प्रयत्न )
आता वेटर २ रा आला आहे. राहुल त्याच्या कड़े रागाने पहातो तो कपळावर हात मारून घेतल्या सारख करतो आणी आत पळतो
रुजुता :केंसल करुया का ऑर्डर
राहुल :चल असच जावुया, पैसे त्या बाकी लोकान कडून घ्या म्हणावं .
रुजुता : चला
दोघे सरळ उठतात आणी बाहेर येतात. चीनीकम बाहेर उभी आहे
चीनीकम :गुड नैट सर
तिच्याकडे न पहाताच दोघे सरळ लिफ्ट मध्ये शिरले आणी ५ वा मजला गाठला .

इथे आत
वेटर १ ला :(हातात सिझलर घेवून ) ये दोनों कंहा गये ?
वेटर २ रा :टॉयलेट तो नही गए ?
वेटर १ ला :दोनों एक साथ ??
वेटर २ रा :रख देना टेबल पे, आके खा लेंगे
वेटर १ ला :कही भाग तो नाही गए ?
वेटर २ रा :@#!~? अबे धुंड उनको, पैसे नही दिये है .
वेटर १ ला :वो चीनीकम को पूछ जरा.
वेटर २ रा :ओ चीनी कम ,वो फ्रेंचकट वाला आदमी बाहर गया क्या ?
चीनीकम :या गोन (नाकात)
वेटर १ ला :मारे गए, अभी क्या करे.
वेटर २ रा :मैं बाहर देखता हु, चालु लोग #!!*@%
वेटर १ ला :इसका अब क्या करे ( थंड झालेल्या सिझलरकडे पाहात)
वेटर २ रा :मेरे सर पे डाल दे ( स्वताच्या डोक्यावर हात ठेवून )
आणी ते धुर सोडणार सिझलर थंडलर बनुन जातं. दोन्ही वेटर कपाळाला हात लावून मटकन खाली बसतात (अंधार होतो, पडदा पडतो )

बुधवार, ५ ऑगस्ट, २००९

स्वर्गसफर

२५ मार्च २००८
नाइट शिफ्ट झाल्यानंतर मी स्वर्गाच्या स्वप्नात बुडालो. मोबाईल जोरात ओरडला आणी दुपारी दोन च्या सुमारास मी तयारीला सुरवात केली. आय टी सी मध्ये आल्यानंतर नवीन लोकाना कम्पनिची माहिती देण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला जातो त्याच नाव आहे " कन्नेक्ट २००८". मला आय टी सी त येवून जवळपास वर्ष झाल होत त्यामुळे तसा मी नवीन नव्हतो पण उशिरा ने मला या कनेक्टच आमंत्रण आल होत. अंगारकी संकष्टी असल्याकाराणाने माझा उपवास होता. तिकिटे तयार होती आणी त्यामुळे मी साबूदाणा खिचडी बनवायला घेतली.पण कुठे माशी शिंकली कोण जाणे त्या साबुदाण्याचे पीठ झाल आणी खिचडीचे मोदक पिठात रूपांतरण झाल. इथले साबूदाणे चांगले नसतात. ( नाचता येइना अंगण वाकडे ). ते तत्सम खिचडीरुपी पीठ खावुन, नव्हे पोटात ढकलून मी सामानाची बांधाबांध केली. संध्याकाळी ७ च्या सुमारास घर सोडल. यमाचा रेडा लकडी का पुल इथे उभा होता. मी ओफ्फिसात जावून माझे नाव नोंदवल. यमाच्या रेड्याला पहायला मी खुप उत्सुक झालो होतो. रेडा पेट्रोल पम्पावर चरत होता आणी रात्रि ९ च्या सुमारास हलणार होता. अर्थात भारतीय असल्याने तो साडेदहाला हलला. ते सुद्धा लोकांनी चाबुक मारल्यानंतर.... त्यानंतर तो पूर्ण हैदराबाद मध्ये फिरत राहिला इतर आत्म्यांना घेण्यासाठी. या वेळेस मी विंडो सिट बुक केली होती मला बाहेरचे ग्रह, तारे पहायचे होते ना. शेवटी एकदाच त्याने हैदराबाद सोडल आणी थोड्याच वेळात कानडीत काहीतरी त्या टी व्ही रूपी तोंडातून बडबडू लागला. अर्थात मला ' कन्नड़ बरुद इल्ला आणी कन्नड़ तिलुद इल्ला' होते. मी बाहेरचे नज़ारे पहाण्यास सुरवात केली. मम्मीचा फोन आला. तिने मला उपवास सोडायला सांगितल. त्या मोदाकाच्या पिठाने माझ्या अन्ननलिका चोक केल्याने मी काही खाण्याच्या परिस्थितीत नव्हतो. पण नावाला उपवास सोडण्यासाठी म्हणुन मी काही इडल्या विकत घेतल्या आणि त्या रेड्यावर बसून उपवास सोडला. पृथ्वीवरच्या प्रदुषणामुळे चन्द्र तारे काही दिसत नव्हते. रेडा उडू लागला आणी मी गाढ़ झोपी गेलो स्वर्ग पहाण्याच्या स्वप्नात .

२६ मार्च २००८
प्रातविधिसाठी रेड्यावर काही सोय नसल्याने पंचाइत झाली. कालच मोदक पीठ अन्ननालिकेच्या दुसऱ्या बाजूला पोहचून बाहेर येण्याचा आटापीटा करत होत्. भारतीय रेड्याना ही सोय का नसते काय कोण जाणे. तो जितका उशीर होइल तेवढी परिस्थिति हाताबाहेर जाणार होती. अकराच्या सुमारास रेड्याने मला स्वर्गाच्या प्रवेशद्वारापाशी सोडल. या भागाला बेंगलुरु मेजेस्टिक म्हणतात. मी आधीच ममताला फोन करुन माझ्यासाठी गेस्ट होंउस बुक करायला सांगितल होत्. आमच गेस्ट होंउस, पृथ्वी वरुन येणाऱ्या लोकांसाठी थांबण्याच ठिकाण. पण नेहमी प्रमाणे मला काही उत्तर तिच्याकडून मिळाल नव्हत त्यामुळे मी स्वताच एखादी रूम पहायच ठरवल. शहरात फिरू लागलो. माझी कन्डीशन फार ख़राब होती त्यामुळे मला लवकरात आसरा मिळणे आवश्यक होत. लवकरच मला एक रूम मिळाली आणी मी मोदक पीठ मोकळे केल. संध्याकाळी मेजवानी असल्यामुळे मी जेवणार नव्हतो. पोटात कावळे ओरडत होते आणी मी त्यांना शांत करत होतो. दुपारचे प्रातविधि करून मी आंघोळ आटपली आणी ४ वाजता बेंगलोर हेड ऑफिससाठी निघालो. रिक्शारूपी दिव्य अश्वावर स्वार होवून मी चंद्रगुप्ताच्या राजवाड्यात पोहचलो. काही अतृप्त आत्मे इथे ताटकळत होते. वेणुगोपाल पुप्पाला त्यातला एक. हाय हेलो झाल्यावर मी राजवाड्यात गेलो. इथे सांगण्यात आल की आणखिन एक रेडा सर्व आत्म्यांना स्वर्गात घेवून जाण्यासाठी तयार आहे. या स्वर्गाच नाव होत् ' विंडसर मनोर '. आय टी सी च्या होटल श्रुन्खलेतल हे एक ५ स्टार होटल आहे. ५ .३० ला रेडा हलणार होता पण हा सुद्धा ठरला भारतीय, ६.३० ला निघाला. सुधीर पिम्पळे आणी अनंत कृष्णन हे शेवटचे आत्मे होते. त्यांना यायला थोडा उशीर झाला होता, स्वर्गातल्या रस्त्यांवर खुप गर्दी असते ना त्यामुळे. रेडा बंगलुरुच्या हवेत उडू लागला. लवकरच तो स्वर्ग दृष्टीपथात आला. विंडसर मनोर ,एक भव्य जागा, आत जाण्यासाठी एक वेगळा रस्ता, एक महाराजाच्या वेशाताला द्वारपाल, ५ झेंडे , जे ते ५ स्टार दर्शवत होते ( नंतर आम्हाला आणखिन काही झेंडे दिसले त्यामुळे कळल की झेन्ड्याचा आणी स्टारचा काही संबंध नाहीय ) मग आम्ही सगळे एका मोठ्या होंल मध्ये जावून एका टेबलावर बसलो. आमचे फ़ूड डिविजनचे सी इ ओ नवरेसर आमची वाट पाहत होते. त्यानी मग एक आय टी सी बद्दल मोठ भाषण दिल आणी आत्म्यांचे बरेच प्रश्न सोडवले. आता सर्वाना मेजवानीची ओढ़ लागली होती. लवकरच भाषण संपल आणी सर्वे अतृप्त आत्मे तृप्त होण्यासाठी निघाले. पार्टी सुरु झाली आणी मी पण खुश झालो कारण गुरुवार १२ ला सुरु होणार होता आणी मला पण ती पार्टी अनुभवायची संधी मिळणार होती. जेवण मस्त होत वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस होते. वरुणदेवाने बाहेर येताना आम्हाला बाहेर येताना ओलं केल. मग भिजतच आम्ही त्या रेड्याला पहायला बाहेर गेलो. सर्व जण गाणी म्हणत ओरडत मजा करत चालले होते. बाहेरच्या अंधारात प्रखर दिव्याचे झोत टाकत रेडा निघाला होता त्या इगलटन गोल्फ रिसॉर्टच्या दिशेने, स्वर्गाची दूसरी बाजु. रिसेप्शन मध्ये जावून आम्ही चाव्यांचा ताबा घेतला. ह्या चाव्या आमच्या सोबत आता दोन दिवस राहणार होत्या. एथ पोहचल्यावर पहिली जागा जी शोधली असेल टी म्हणजे श्रुंगारगृह म्हणजे बाथरूम. दूसरी जागा म्हणजे शयनगृह. अचानक फोन वाजला आणी चन्द्रगुप्त महालात सकाळी नव्हे पहाटे ९ वाजता हजर रहण्यास सांगण्यात आल.

२७ मार्च २००८
सकाळी नव्हे पहाटे ९ च्या सुमारास हजर रहाण्यास सांगण्यात आल होत पण उठण्यास सर्वांना उशीर झाला आणी सगळे लेट झाले आम्ही सकाळी १० वाजेतोवर तयार होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. जायच होत चन्द्रगुप्त महालात पण रस्ता भोजनग्रुहातुन जात होता. पेटपूजा म्हणजे सकाळचा नाश्ता ( कोण जाणे जेवायला मिळेल की नाही ) जेवणासारखा करून झाल्यावर देबाशीष नावाच्या शक्तिद्वारे चंदगुप्त महालाकढे ओढला गेलो. पहिला तास नवरे सरांचा होता पण त्यानी काल आमची भेट घेतली असल्याने हा वेळ मोकळा होता. वाटलं सर्वांना की आता मजा करुया पण तेवढ्यात तो संचालक यम् अवतरला आणी त्याने आमच्या वर टेस्ट पेपरचा बौम्ब टाकला. ७५ घणाघाती प्रश्न आणी म्हणे ४५ मिनिटात सोडवायचे, त्यासाठी एक स्पेशल प्राएझ ' पृथ्वी वर परत जावून विल्स लाएफ़ स्टाइल मध्ये १००० रु चे कपडे घ्यायचे' घोषित झाल. आम्हाला परत जायचे नव्हते आणी त्यामुळे कुणीही टी टेस्ट सिरिअसली घेतली नाही. पहिल्या पाचान्ना ही संधी मिळणार होती म्हणजे ५००० रु ते वाटणार होते. सर्वांना माहित होते त्या महागड्या विल्स लाएफ़ स्टाइल मध्ये १००० रु त चड्डी बनियान पण मिळणार नाही. टेस्ट सुरु झाली. खर तर आम्ही स्विमिंग पूल किंवा कुठे तरी फिरायला जायला मिळेल म्हणुन खुश खालो होतो पण यमाने आम्हाला पेपर दिला होता प्रुथ्विलोकात परत जाण्यासाठी. कोण तो मुर्ख असेल ज्याला आता इथून परत जायच असेल. ४५ मिनिटे संपली आणी पेपर काढून घेण्यात आले. पृथ्वीवरच्या ' कोन बनेगा करोड़पति ' च्या धरतीवर तो पेपर होता. स्वर्गातल्या लोकांनी ही आयडिया चोरली होती. मी याबद्दल चन्द्रगुप्ताकड़े तक्रार नोंदवायच ठरवल. चहाची वेळ झाली होती. चहानंतर पहिला तास सुरु झाला. सर्व पेंगायला लागले होते. चहा आतापर्यंत जरूरीचा झाला होता. फायनांस डिपार्टमेंट चे मुख्य हेमंत मलिक हा पहिला यक्ष होता. या स्वर्गाबद्दल आम्हाला सांगणार होते. त्यांनी मग आम्हाला ब्रांड बनवण्यासाठी काय करव लागत ते सांगितल. बिंगो सनफीस्ट वगेरे ब्रांड बनवण्यासाठी झालेल्या त्रासाची माहिती दिली. दोन तासाच्या माहिती नंतर आम्ही भोजनासाठी तयार झालो. आज गुरुवार असल्याने मला मांसाहार व्यर्ज होता. त्यामुळे मी गान्धर्वांच्या रांगेत उभा राहिलो वेज खाण्यासाठी. २० प्रकारचे जिन्नस ताट भरून घेतले.( त्या आधी मला विचारव लागल की कुठले पदार्थ वेज आहेत आणि कुठले पदार्थ ... आक थू ). काही नॉन वेज अतृप्त आत्मे ( कालच्या पार्टी नंतर अजुनही अतृप्त राहिलेले ) त्या रांगेत उभे राहिले जिथे ते मिळत होत... आक थू. स्वीट डिश त्या नंतर आइस क्रीम , वाव !! मी तृप्त झालो.
कविंदर सिंग वाट पाहत असल्याच बोलावण आल. खावुन चढवलेल्या काही किलोंसोबत आम्ही कसेबसे चंद्रागुप्त महालात पोहचलो. हा दुसरा यक्ष बिस्किट चा हेड आहे. बिस्किट मधल्या वाढीला वाव असल्याच सांगुन त्यानी अपल सेशन संपवल. पोटभर जेवल्याने जांभया येत होत्या. अतृप्त आत्मे झोपण्याच्या मुड़ मध्ये होते. २ तासांच्या त्या कंटाळवाण्या सेशनानंतर चहाची वेळ झाली. फारच आवश्यकता होती त्याची. प्रत्येक ब्रेक मध्ये आम्ही श्रुंगारगृहाला भेट देत होतो. अन्नमार्ग मोकळा करण्यासाठी...
शेवटच सेशन एच आर चे हेड अमिताव मुखर्जी यांच होत. तीसरा यक्ष, त्यांनी आमच्या एच आर च्या पालिसी बद्दल ( थोडक्यात स्वर्गात काय करायच आणी काय नाही याबद्दल) सांगितल. " उतरेकडच्या लोकांना दक्षिणे कड़े आणी दक्षिण लोकाना उत्तरे कड़े का पाठवता ?" कुणीतरी विचारल. काय उत्तर देणार होते ते ? शेवटी ३ तासांनी हा दिवस सम्पला. सरते शेवटी, यम अवतरला आणी त्याने ते टेस्ट बोम्बरचे बक्शीश कुणाला मिळणार ते जाहिर केल. उलट्या रितीने ५ नावे त्याने उच्चारली. मी त्यात ३ रा आलो होतो. त्यामुळे मला स्वर्गात स्थान मिळण आता कठिण होत. मला पुन्हा पृथ्वीतलावर परत जावून विल्स लाइफ स्टाइलमध्ये चड्डी बनियान घ्याव लागणार होत. विल्स लाइफ स्टाइल हे आय टी सी च आहे त्यामुळे आय टी सी फक्त इथेच बक्शीश देते हे बऱ्याच लोकांना हे माहित नव्हत.
आम्ही सुटलो होतो आणी मौज मजेचा सेशन सुरु होणार होता. मग आम्ही गोल्फ रिसॉर्टला एक चक्कर मारली आणी पोहण्याच्या तलावाकड़े गेलो. रात्री ८.३० ला आम्ही तलावात डूंबत होतो. मला पाहता येत नसल्याने मी फक्त पोहण्याच नाटक करत होतो. गटानगळ्या खात आणी भरपूर पाणी पित आम्ही वाटर पोलो खेळलो, खुप मजा केली पण लवकरच अंग दुखु लागल. मग सर्व रात्रीच्या जेवणासाठी गेले. मी आपला पुन्हा गांधर्वांच्या रांगेत उभा...
तिथे एक छोट मिनी थेटर होत. सन्डे नावाचा सिनेमा तिथे लागला होता. सर्व तो सिनेमा पहायला गेले आणी रात्री १२.३० ला झोपायला शयनगृह गाठल. टेलीफोनवरून एका देवदुताने उद्या सकाळी ९ वाजता चन्द्रगुप्त महालात येण्याचा निरोप दिला.

२८ मार्च २००८
सर्व प्रकारच अन्न म्हणजे चायनीज, मेक्सिकन, फ्रेंच, थाई वगेरे, जेवून पोटात गटार झाल होत. तो चिखल साफ़ करायला रात्री आणी सकाळी श्रुंगार गृहाच्या बर्याच फेऱ्या माराव्या लागल्या. शेवटी सकाळी ते सर्व साफ़ झाल नव्याने भरण्याकरिता...अस ठरवल होत की सकाळी लवकर उठून पाण्यात डूम्बायाच पण ते सुख आमच्या नशिबात नव्हत. आठ वाजता त्याच कालच्या देवदूता कडून फोन आला. मी हळूच म्हटल " यस सर ", आणी पुन्हा झोपलो. अर्थात उठायला उशीर झाला आणी भोजन गृहात पोहचेपर्यंत १०.३० वाजले. नाश्ता घाईघाईत झाला पण जेवणासारखा.. १५ प्रकारचे जिन्नस, चवीसाठी थोड़े थोड़े घेतले पण तरीही ते ताट भरल, कोर्न फ्लेक्स, केक, बटर, जाम, टोस्ट, भुर्जी, उकडलेल अंड, चवली उसल, उपमा,स्पगेटी, इडली, मेदुवडा, पेपर डोसा, आलू परोठा, साम्बार, चटनी, चहा ,कोफी, दूध,शेवटी कलींगडाचा आणी द्राक्षाचा ज्यूस. आता हा नाश्ता म्हणायचा की जेवण म्हणायच.
विक्रम पारिख, वाट पाहात होते अकरापर्यंत, ते आटा, मीठ, मसाला पावडर, वगेरे बनवणाऱ्या स्टेपलचे हेड आहेत. त्यानी मग स्टेपल बद्दल प्रेसेंटेशन दिल. सर्वानी त्याना प्रश्न विचारून भंडावुन सोडल. जेवणाची वेळ झाली होती. आज मात्र मी गांधर्वांच्या रांगेत उभा नव्हतो. आज शुक्रवार ना... आज मी जावून उभा राहिलो त्या दानवांच्या रांगेत. नॉन वेज खाण्यासाठी. खाताना फोटो सेशन केल गेल. नेहमी खाताना लोक का फोटो काढतात मला कळत नाही, तोंडाचा कन्सर झाल्यासारख वाटत. आमचे टॉप बॉस व्ही एल राजेश वाट पाहात असल्याचा निरोप आला आणी माझ अन्न अचानक पचलं...आणी माझी श्रुंगारगृहाची आणखिन एक वारी झाली. बुळकी रिकामी करुन आम्ही पळालो आमच्या टॉप बॉस च्या प्रेजेंटेशनसाठी. आम्हाला खुप टेंशन आल होत, न जानो त्यांनी आम्हाला त्या अतृप्त आत्म्यांच्या प्रश्नाना उत्तर द्यायला सांगितल तर. ते आम्हाला नावाने ओळखतात आणी आल्या आल्या त्यानी आमच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला, " एस तिलवे , नाऊ यु शुल्ड गीव प्रेजेंटेशन , व्ह्याय सो
लेट इन् कनेक्ट", पहिला बौम्ब...
" सुधीर, व्ह्याय यु आर नोट स्पीकिंग ". सुधीर ला क्लीन बोल्ड केल.
" वेणुगोपाल, व्हाट'स हप्पेनिंग इन् लीमेक , यु आर अल्सो टू लेट इन् कनेक्ट ". वेणु ची विकेट पडली.
" गुड आफ्टरनून आल, व्ह्याय माय सेशन दे केप्ट आफ्टर लंच आय डोंट नो, बट आय विल प्रोमिस यु आल डाट आय विल नोट लेट यु पीपल स्लिप ,व्हाट आर युअर क्वेस्चनस यु कैन आस्क नॉव अझ यु पीपल आर न्यू , आफ्टर कन्फर्मेशन आय विल आस्क क्वेस्चनस एंड यु हँव टू आंसर ." आम्ही आमची डोकी समोरच्या लोकांच्या खुर्ची मागे लपवली.
सर्व लोक प्रश्न विचारू लागले. " तुम्ही लोक चुप का तुम्ही पण प्रश्न विचारू शकता ". त्यांनी आमच्याकडे बोट केल.
" सर , व्ह्याय वुए आर पुत्टिंग अवर प्लांट ...." सुधीर ने हिम्मत केली. " फ़क्त विचारण्यासाठी म्हणुन विचारतोयस का प्रश्न ", त्याला बोलूच दिल नाही, सुधीर चुप एकदम... त्यांनी मग सगळे प्रश्न प्रेजेंटेशन मध्ये टाइप केले आणी २ तासांच प्रेजेंटेशन दिल आणी सर्व अतृप्त आत्म्यांच्या प्रश्नांन्ना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. भयंकर इंग्लिश... काही वाक्ये डोक्यावरून गेली. " नवा कंत्राटदार कसा निवडता" ह्या प्रश्नावर त्यांनी सुधीरला म्हटल " एस सुधीर, आंसर धिस एज यु आर सेटिंग अप् विथ न्यू कोन्त्रक्ट टू लक्ष्मी फूड्स", सुधीर लटपट... " सर अअअ !!!, अक्चुअल्ली फर्स्ट वुई आ.. आ.. आ..!!!! हँव टू सी अ अ अ !!! दयाट द कांट्राक्टर आ आ आ ...!!! ".
" फरगेट इट, आय विल एक्सप्लैन ". मग त्यांनी आपण कांट्राक्टर कसा निवडतो ते सांगितल. आधी आमच कांट्राक्ट असायच की आमचा माल बनवण्यासाठी जो खर्च येइल तो आय टी सी त्या कांट्राक्टरला देइल आणी कांट्राक्टरला सर्व हाताळाव लागेल, माणसे, मशीन, पावर वगेरे, पण आता मशीनरी आमची असते आणी बाकी त्यांच, एका मोठ्या सेशन नंतर वातावरण थोड हलक झाल, चहा बरोबर फोटो सेशन झाल.सर्व गोल्फ रिसॉर्ट च्या मैदानावर जमलो. त्या हिरव्यागार मैदानावर एक फोटो कैमरा बंद झाला. यमाकड़े सर्वांनी एक एक फोटोची मागणी केली. एकूण ४० फोटोंची ऑर्डर त्या फोटोवाल्याला मिळाली.
" किचन ऑफ़ इंडिया" च पुढच सेशन होत. डॉ विजय माल्या, त्याचे हेड. चहा नंतर सुद्धा झोप यायला लागली. ते प्रेजेंटेशन मधल्या ओळी फक्त वाचत होते. मजेची गोष्ट म्हणजे त्यांच्या त्या प्रेजेंटेशन मध्ये तारीख होती १ अप्रैल २००५, म्हणजे ३ वर्षा आधीची. अतृप्त आत्मांच्या प्रश्नाना उत्तरे देण्यात असमर्थ होते, लवकरच सर्वानी नाद सोडून दिला आणी एक छान झोप काढली. नंतर कुणीतरी कनेक्ट बद्दल कम्मेंट लिहिली की हे " किचन ऑफ़ इंडिया" च सेशन जेवण्यानंतर ठेवावे जेणेकरुन लोकांना चांगली वामकुक्षी करता येइल. दिड तासाच्या पोथी वाचनानंतर आम्ही बाहेर गेलो. इकडे तिकडे फिर, कुठे फोटो काढ वगेरे झाल्यावर पुढच्या सेशनला तयार झालो. सिएंचन बनर्जीच शेवटच सेशन होत. ते लोजिस्टिक आणी प्रोकुर्मेंटचे हेड आहेत. त्यानी मग लाखो आणी करोडोंचे खेळ केले. सप्लाय चेन म्हणजे काय ते सांगितल. आम्ही सगळे तर सेशन संपण्याची वाट पहात होतो. आज मात्र उशीर झाला, संद्याकाळी ७ ला आम्ही बाहेर आलो. आय टी सी अस लिहिलेला टी शर्ट सर्वाना वाटण्यात आला. स्वर्गातल वास्तव्य आता संपत आल होत. आम्हाला परत म्रुत्युलोकात जाव लागणार होत. तीथे परत पाठवण्यासाठी उद्या ३ रेडे येणार होते. पहिला सकाळी लवकर येणार होता. दुसरा दुपारी आणी तीसरा संद्याकाळी... मी काही लवकर परत जाणार नव्हतो म्हणुन मी शेवटच्या रेड्यावरून जायच ठरवल. फोटो वगेरे काढून त्या पूर्ण गोल्फ रिसॉर्टला चक्कर मारायची ठरवली होती पण जे ठरवल ते कागदावर रहात हा अनुभव नवा नाही. आज पण पोटात अपेक्षेप्रमाणे गटार झाल होतच. पण स्वर्गाची शेवटची मेजवानी तरी का सोडायची म्हणुन आम्ही रात्रीच जेवण घेतल. झोपण्याच्या आधी त्या छोट्याश्या चित्रपटगृहात ॐ शांति ॐ हा चित्रपट रात्री १२ ला झोपायला शयन गृहात गेलो. आज कुणी देवदूत नव्हता उद्या उठवायला. आम्हीच ठरवल उद्या पूर्ण गोल्फ रिसॉर्टला फिरायच. उद्या १२ पर्यंत वेळ होता सर्वांकड़े गोल्फ खेळण्यासाठी..

२९ मार्च २००८
एक्शन प्लान नेहमी कागदावरच रहातो हा नेहमीचा अनुभव मागे टाकुन सकाळी ८ ला उठून भ्रमण करण्यासाठी तयार झालो. भटकंती आणी सोबत मोबाइल वरून फोटो काढणे चालूच होते. गोल्फ रिसॉर्ट आणी गोल्फ नाही खेळला तर कसं. मग एक चेंडून्नी भरलेली टोकरी घेवून त्या गोल्फच्या काठीने गोल्फ खेळू लागलो. लवकरच ते चेंडू समोरच्या मैदानावर नाहीसे झाले आणी आम्ही परत पृथ्विलोकात जाण्याची तयारी केली. पहिला रेडा तयारच होता आणी सर्वे सामान बांधून बाहेर आले. एकमेकांचे फोन नं वगेरे लिहून घेण्याचा कार्यक्रम झाला भविष्यात कोंटेक्ट ठेवण्याच्या आणाभाका झाल्या. सर्वानी एकमेकांना मग प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. सुधीर आणी इतर बरेचसे अतृप्त आत्मे पहिल्या रेड्यावर स्वार झाले होते. शेवटच्या रेड्यासाठी आम्ही दोघेच उरलो. संजय कठिमारे आणी मी.. त्याचा आणी माझा जास्त सम्बन्ध आला नव्हता, " कब आयेगी गाड़ी " त्याने विषय काढला. " ३ बजे तो बोला है न ", मी. " आप कहा से हो " मी विचारणा केली आणी आतापर्यंत मी त्याच्याशी काहीच बोललो नसल्याच जाहिर केल. तो म्हटला, मुंबई, " मराठी आता है ", मी आश्चर्यचकित. " हो येत ना ". आमच्या पूर्ण मराठी गैंग बरोबर तो कसा नाही ह्याचा मला क्षणभर खेद वाटुन गेला. शेवटचा रेडा येई पर्यंत त्याच्याशी मराठीत गप्पा झाल्या. मला हेड ओफ्फिसला जाव लागणार होत माझी परतीची तिकिटे त्या ममताकड़े होती. ३ ला बरोबर रेडा आला आणी आम्ही ते रिसॉर्ट सोडलं. ट्रेफिक मुळे हेड ऑफिसला जायला तब्बल २ तास उशीर झाला. ममता कडून तिकिटे घेतली आणी कुच केल त्या बसच्या स्टार्टिंग पॉइंटकड़े. ह्या वेळच्या रेडयाच नाव होतं शर्मा ट्रेवल.. मी रात्रीच जेवण केल मला काय माहित त्या रेड्यावर जेवणाची सोय असेल म्हणुन. साडे आठला तो रेडा हलणार होता. आणी तो बरोबर वेळेत हलला. मी घरी परत निघालो. यावेळेस पण मला विंडो सिट मिळाली होती आणी तारे व ढगांचा आनंद मला त्यामुळे घेता येणार होता. हा रेडा " भूल भुलैया " नावाचा चित्रपट दाखवायला लागला पण लवकरच मला झोप लागली.

३० मार्च २००८
पहाटे " राजिव गाँधी इंटरनेशनल एअरपोर्ट - ५ की मी " हा बोर्ड पाहताच उठून बसलो.माझा सर्व सामान एकत्र केला आणी आराम घर ला उतरलो. रिक्शा ने घर गाठल.
एकूण काय हा एक संस्मर्णीय आणी मनमोहक अनुभव होता. इतर कुठल्याही ग्रुप पेक्षा आम्ही मराठमोळ्या ग्रुप ने जास्त मजा केली. इथले हे क्षण मी कधीच विसरु शकणार नाही. रोजच्या रूटीन आयुष्यातून एक वेगळा विरंगुळा मिळाला आणी आयुष्य पुन्हा प्रफुल्लित झालं.

मंगळवार, ७ जुलै, २००९

माझा पहिला वहिला विमान प्रवास

माझा पहिला वहिला विमान प्रवास....
पंकजकडे हैदराबादला जायच होत. त्याने विमानाच टिकिट काढल होत. हैदराबादला मासे मिळत नाहीत म्हणून मुंबईचे मासे तिथे नेवून खावेत अस ठरल होत. त्याची खरेदी झाली आणी ' मोहरी आणी पापलेट 'हे नवे पाहुणे आमच्याबरोबर विमान प्रवासाला तयार झाले. विमानात बसण्याचा योग आहे अस म्हटल्यावर ज़रा खिश्याला कापूनच आले .आल्या आल्या त्यांची चांगलीच सरबराइ झाली . मी मम्मी पप्पा आणी मावशी असे आम्ही ४ जण निघालो होतो. मुंबई म्हटली की गर्दी ही आलीच. गर्दीतून लटकत आम्ही घाटकोपर गाठल. टेक्सीला साद घातली आणी ' डोमेस्टिक एयरपोर्ट हं, नही तो इन्टरर्नशनल ले चलेगा ', अस त्या मकट टेक्सीवाल्याला जरा रुबाबात सांगितल. अर्थात विमानतळावर जाणारे म्हणजे आयतेच चालून आलेले बकरे अशी त्याची समजूत असल्याने माझा हां रुबाब मला १६० रुला पडला. बाहेरच उभ्या असणार्या ट्रोलीवर आमच सामान चढ़ल आणी मोठ्या मुश्कीलीने ट्रोली ढकलत आम्ही विमानतळात शिरलो . मला नंतर कल की त्या ट्रोलीच्या वर एक फ्लेपर असतो आणी तो दाबल्या शिवाय त्या ट्रोलीचा ब्रेक्क सुटत नाही. मी ब्रेक लावलेल्या स्थितीत ती ट्रोली महत्प्रयासाने ढकलत होतो. नवखेपणाचा पहिला फटका. तिथल्या काही लोकांनी ' काय गावठी आहे हा ' अश्या काहीशा नजरेने पाहिल. तो फ्लेपर दाबुन गाडी रुळावर आली. मी चेक इन च्या काउंटर वर उभा राहिलो, तिथे असणारयानी मला सामान स्कैनिंग करणारयांच्याकडे पाठवल. पुन्हा त्याच नजरा.. सामाना बरोबर हँड्स ब्यागा पण तिथे ठेवल्या, ते मशीन फक्त मोठ्या ब्यागा खातं हे तेंव्हा कल. मागे उभ्या असणार्यानी पुन्हा तेच लुक दिल.... टिकिट काउंटर वर सुन्दर मुली का बसवतात... " विंडो सिट हवी, मधली नको " ही इंग्लिश मध्ये घोकून पाठ केलेली वाक्यं विसरलो आणी एकाच विंडो सिट आणी बाकीच्या मागच्या मधल्या जागा.. गळ्यात पडल्या.
पुढे आणखी सिक्युरिटी चेक, इथ तरी त्या नजरा नको अस ठरवून सुद्धा आमच्या कडच्या पिशव्यांवर ते कसलेसे टैग लावायचे राहून गेले, अश्या नवख्यांची त्याना सवय असल्याने त्यांनी आम्हाला टैग दिले आणी आमच्या सामानावर बांधून आमच्यावर उपकार केले.
बोइंग ९ डब्ल्यू ४५१ नं च हैदराबाद ला जाणार विमान स्टेशन वर लागल्याची घोषणा झाली. आमच टिकिट पुन्हा चेक झाल आणी आम्ही एका बस समोर उभे राहिलो. पैसे भरलेत ना भरपूर मग स्टेंडिंग जायच कशाला ? बस सोडली, पुढची बस पुढ्यात येवून उभी राहिली, रेल्वेत जागा पकडतात तश्या घाइ घाइने जागा पकडल्या. त्या गाडीत जेमतेम ५ - ६ च जागा होत्या आणी आम्हाला जागा मिळाल्याने धन्यता वाटली. मागे उभे असणार्यानी पुन्हा तेच लुक दिल. ५ मिनिटात विमान दृष्टीपथात अल आणी बसचा दरवाजा खाडकन उघडला गेला.आम्ही विमानाकडे पोहचलो, त्या नील आर्मस्ट्रोंगला चंद्रावर पहिलं पाउल ठेवताना जस वाटल असेल तस मला वाटल. २० ए ,बी, सी, डी मी जागा शोधल्या. सिट बेल्ट हा आणखिन एक त्रासदायक प्रकार, एका बाजुच्या पट्ट्यामध्ये दूसरी बाजू घुसवली , जिथून म्हणुन घुसवता येइल तिथून, ती आत ढकलली तरी ती अडकेचना, मग मी मागुन पुढून खुप प्रयत्न केला पण काही केल्या ती अडकेना. शेवटी खुट झाला आणी मी बांधला गेलो. आता बांधल तर खर पण उघडायच कस ? चक्रवृहात अडकलेल्या अभिमन्युच्या वेदना अनुभवल्या. त्या फ्लेपरला फटकावल तर त्याचा वरचा फ्लापर वर आला आणी मी चक्रव्यूह भेद्ला. गाडी म्हणजे विमान हलल. आमच्या बाजुच्या विंडो सिट वर कुणीही नव्हता आणी गाड़ी सुटली तेंव्हा कुणी येणार नाही अस म्हणत मी ती सिट पटकावली, पप्पान्नी मग मागची एक विंडो सिट पटकावली. लोकांच्या नजराना भिक न घालता आम्ही पहिल्या विमान उड्डाणाला तयार झालो.
विमान हवाइ पट्टी वर येवून थांबल. कानात कापसाचे बोळे गेले, हवाइसुन्दरींच्या हातातून पेपरमीन्ट च्या गोळ्या घेतल्या. पुन्हा खर खर सुरु झाली आणी विमानाने वेग घेतला, काही सेकंदात वेग भरमसाट वाढला आणी आम्ही जमिन सोडली. काही क्षणात ' अरेबियन नाइट 'च्या अलिफ़ लैलात शहर, माणसं जशी लहान होतात तशी ही मुम्बापूरी लहान झाली. मोठाल्या बिल्डिंगी गाड्या क्षणात पायाने चिरडून टाकाव्या इतक्या लहान झाल्या. थोड्याच वेळात मुंग्या मोठ्या वाटाव्या इतक्या लहान झाल्या. अप्रतिम, सुंदर, काय तो देखावा डोळ्यात मावेचना तो मुंबई चा गोलाकार आकार, अगदी नकाशा पाहिल्याप्रमाने दिसू लागला. विमानाने तीव्र वण घेतल आणी ते समुद्रावर आल. समुद्र चमचाभर पाण्यासारखा दिसू लागला, कुणीतरी रांगोळी काढावी तसे ते रस्ते झाडे झुड्पे, आणी डोंगर दिसू लागले, विमानाची उंची सातत्याने वाढत होती. थोड्याच वेळात आम्ही ढगांच्याही वर आलो होतो. ढगांच्या मधून ती सुंदर रांगोळी पहात होतो.
ते इंट्राफ्लाएट इंस्ट्रक्शन सुरु झाल होत. सिट बेल्ट, फुगवणारी पिशवी वगेरे, समजावून हातवारे करत सांगत होते. पेट पूजेसाठी काहीतरी आणल जात होत. वेज की नॉन वेज अशी विचारणा झाली, मी नॉन वेज मागवल. चिकन स्यांडविच, रसमलाई, आणी इटूकल्या पिटूकल्या बेचव इडल्या पदरात पडल्या. कोफिचे तर तिन तेरा वाजलेले. कोफी वेगळी, दूधपावडर वेगळी,आणी साखर वेगळी.सगळ एकत्र करायच आणी कोफी पिल्याच समाधान मानायच.
थोड्याच वेळात आपण हैदराबादला उतरणार अशी अनोउंसमेंट झाली, विमानाचे पंख वर उचलले गेले आणी उंची कमी होवू लागली. खालचे ढग जवळ येवू लागले आणी विमाना भोवती धुक जमा होवू लागल. ढगातुन खाली उतरल्यावर पुन्हा ती रांगोळी नयन सुख देवू लागली, अलिफ़ लैलातल्या जिन प्रमाणे खलील वस्त्या मोठ्या होवू लागल्या. ढगातुन गळून येणारया किरणामुळे तो देखावा अतिशय सुन्दर दिसत होता. पुन्हा ते तीव्र वळण घेतल गेल आणी चारही बाजूने ती रांगोळी पहायला मिळाली. वेग आणी उंची झपाट्याने कमी होत होती बिल्डिंगी, रस्ते, मोटार गाड्या मोठ्या होवू लागल्या, मुंग्यांची माणसं झाली आणी धाव पट्टी वर विमान आल, अचानक एक धक्का बसला आणी विमानाचा आणी जमिनीचा तब्बल तासाभराने संगम झाला. धाव पट्टी वर विमान पत होत. ब्रेक लागले आणी गाड़ी प्लेटफॉर्म ला लागली. ' हैदराबाद ला तुमचे स्वागत , जेट एअर वेज ने प्रवास केल्याबद्दल धन्यवाद " हे वाक्य हवेत शिरताच विमान थांबल आणी सर्व लोक सामान घेवून पटापट बाहेर पडू लागले. आम्ही पण बाहेर पडलो, विमानातल स्वछता गृह आपण पाहिलच नाही.... रुख रुख लागुन राहिली, मग विमानतळावर उतरून ती रुख रुख ' ओली ' केली. एका मोठ्या बेल्ट वरून आमच्या ब्यागा बाहेर आल्या, ट्रोली इथही होती पण त्याला तो फ्लेपर नव्हता, मी तो फ्लेपर शोधत होतो, थोडक्यात ही गाडीच गावठी होती बिना ब्रेक ची..., शेवटी मीच पूर्ण हैदराबाद कड़े तो गावठी पणाचा कटाक्ष टाकुन माझ्यावर मुंबईत झालेल्या प्रकाराचा वचपा काढला.....


राहुल तिवे