सोमवार, २९ जुलै, २०१९

एक फसलेला दिवस
कल्याण हैदराबाद परतीचा प्रवास
दिनांक 28 जुलै 2019
    आदल्या दिवशीच्या महालक्ष्मी एक्सप्रेस प्रकारानंतर आम्ही हादरलो होतो. बातम्यांमध्ये उगाच काहीतरी वाढवून सांगितले जात होतं. वाटलं उगाच काहीतरी सांगत आहेत.. असं काही नसेल पण पुढे काय वाढून ठेवलं होतं याची आम्हाला काय कल्पना...
     आदल्या दिवशी रात्रीपासून ट्रेनचं स्टेटस चेक करणं सुरू झालं... कोणाक एक्सप्रेस, हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस, 'लाइव रनिंग स्टेटस' मध्ये टाकून पाहणं सूरू केलं... प्रत्येक ट्रेनचं स्टेटस दाखवत होतं किती बदलापूरला येऊन तिथेच थांबलेली आहे.. काहीच कळेना आमच्या ट्रेनचं स्टेटस काय असेल? काय माहिती? रात्री मोबाईलची 'एसएमएस'ची रिंग वाजली पण आम्ही गाढ झोपेत होतो... त्यामुळे रेल्वेकडून आलेला तो 'एस एम एस' पाहता आला नाही हा एसएमएस खालील प्रमाणे होता.

T NO 17031 EX CSMT OF DT 28/7/19(CSMT-HYB EXP)WILL WORK EX PUNE AND CANCELLED BETWEEN CSMT-PUNE. CONTACT 139 OR ENQUIRY COUNTER.

    सकाळी उठल्यावर तो एसेमेस पाहून पायाखालची जमीन सरकली, डोळ्यासमोर काजवे चमकले आणि काय काय झालं माहित नाही..आमची ट्रेन आणि रद्द..? हैदराबादला जाणं जरुरीचं होतं पण आता करणार काय काही समजेना...
     १३९ वर फोन झाला, हे बटण दाबा ते बटण दाबा, काही उपयोग नाही, ध्वनीमुद्रीत ध्वनी ऐकून फोन बंद झाला..
     पण त्यातल्या त्यात आशेचा एक छोटासा किरण होता... ही ट्रेन मुंबई ते पुणे पर्यंत रद्द होती पण पुण्यापासून पुढे ठरलेल्या वेळेवर निघणार आहे हे कळल्यावर पुण्याला जायचा मार्ग शोधणे सुरु झाले... अर्थात बदलापूर ते कर्जत यामधला रेल्वेचा रूळ पाण्याखाली गेलेला असल्यामुळे कूठल्याही ट्रेनने पुण्याला जाणे जवळजवळ अशक्य होते... शेवटी आपण रेल्वे एवजी इतर मार्गाने पुण्याला जावे असा विचार पुढे आला...
     पर्याय क्रमांक १, विमान... अर्थातच खिश्यात हात गेला... आणखी मान आपोआप नकारात्मक हलली.
     पर्याय क्रमांक २, आधी ठाण्याला रेल्वेने जाणे व तिथून कुठलीही एसटी किंवा बस पकडून पुण्याला जाणे. जरासा त्रासदायक, राजनदादाच्या मते बऱ्याच गाड्या पुण्याहून रिशेड्यूल केल्याने गर्दी असणार हे आलंच.
     पर्याय क्रमांक ३, ओला आऊटस्टेशन गाडी बुक करून पुण्याला सरळ जाणे आणी मग आमचीच गाडी पकडणे.. 
     यातला पर्याय क्रमांक ३ पसंत केला. हा मार्ग थोडा महाग असला तरी  सोयीस्कर होता आणि व्यवस्थित आपण पुण्याला पोहोचू याची खात्री वाटत होती... गाडी रद्द झाली पण तिकीट नाही अशी पळवाट सांगून टिसीला गुंडाळता येईल...
     झालं ओला बुक झाली त्याला सकाळी अकराची वेळ दिली... तर हा साडेदहालाच येऊन उभा ठाकला... माझा जीव भांड्यात पडला.. चला पुण्यापर्यंत जायची सोय झाली... तयारी वगैरे करून निघायला सकाळी साडेअकरा वाजले.. मुंबई ते कल्याण मोठ्या ट्रॅफिकमधून मुश्किलीने मूंबई पुणे महामार्गावर पोहोचयाला एक तास लागला...
पण अजून बराच वेळ असल्याने मी आशावादी होतो...
     वेळेवर पोहोचू की नाही याची मनात असलेली धाकधूक, पाऊस रस्त्यामध्ये पडून पाणी साचून किंवा रस्त्यात काही त्रास होईल का ही शंका... आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण... पण त्याचा आनंद घेता येत नव्हता..
     मस्त गुलाबी थंडी, फेसाळणारे धबधबे, मध्ये येणारी पावसाची एक हलकीशी सर, आरव आणी अवनी वातावरण एन्जॉय करत होते पण माझ्या डोक्यात चाललेल्या चलबिचलमुळे काही केल्या मला प्रवासाची मजा येईना..
     पूढे टोल नाका पार केल्यानंतर गाडी सुसाट वाऱ्याच्या वेगाने पळू लागली आणि पुण्यापर्यंतचं दीडशे किलोमीटरचं अंतर हळूहळू कमी होऊ लागलं. आता कसंही करून आरामात संध्याकाळी साडेचारपर्यंत पोहचतो आपण अशी खात्री होती...
इतर वेगवान गाड्यांची स्पर्धा करत आम्ही जवळपास शंभर एक किलोमीटर अंतर पार केलं असेल तेवढ्यात त्या ड्रायव्हरने गाडी बाजूला घेतली गाडीतून उतरला आणि म्हणाला "टायर पंक्चर हो गया है"...😨
     घड्याळात अडीच वाजले होते, मनामध्ये धस्स झालं.. त्या गुलाबी थंडीतही घाम फुटला, मनात म्हटलं झालं आता काय आपण गाडी पकडत नाही....
"साब, चींता मत करो मेरे पास स्टेपनी है"
तसा अजूनही काही वेळ शिल्लक होता, त्यामुळे मी विचार केला जरी आपल्याला अजून अर्धा तास लागला तरी काही हरकत नाही.. आपल्याला अजून वेळ आहे गाडी पकडायला...
     पावसाची हलकी सर येऊन गेली म्हणून मी गाडीत बसलो सोबत आणलेला नाश्ता गाडीत संपवला... न जाणो नंतर  खायला वेळ मिळेल की नाही....
अर्ध्या तासाच्या मारामारीनंतर त्याने गाडीचं पुढचं चाक बदललं आणि मला म्हणाला, चलते है लेकिन अभी इस टायरमे हवा थोडी कम है... मी म्हटलं "हवा भरने केलीये दुकान कहा मिलेगा, "आगे टोल नाकेके बाद दूकान है, ऊंहा भर सकते हैं"
म्हटलं चलो...
      आम्ही निघालो गाडी घेऊन पाच किलोमीटर गेली असेल तेवढ्यात नवीन टाकलेल्या टायर मधून पुन्हा आवाज येऊ लागला गाडी बाजूला घेतली बघतो तर स्टेपनीचे बारा वाजलेले... अगदी टायरची पावडर झालेली... आणखी भरीला जोराचा धोधो पाऊस सूरू झालेला....
     झालं.. आता तर पोहोचणं अगदी अशक्यच आहे... गाडीत दोन टायर.. आणी दोन्ही टायर पंक्चर... सगळ्या गाड्या भरधाव वेगाने येताहेत आणि निघून जाताहेत.. जोरात पाऊस आल्यामुळे गाडीच्या बाहेर पडता येईना.. त्या महामार्गावर कोणीही थांबत नाही... अशा ठिकाणी आम्ही अडकून पडलो होतो...
     भर पावसात छत्री घेऊन बाहेर उभा राहून प्रत्येक येणाऱ्या इकडे अंगठा वर करून बघत आणि कोणी आपल्याला लिफ्ट देईल या आशेवर मी उगाचच होतो..कारण तोच एक पर्याय सूचत होता.... शर्ट घामाने आणी पॅन्ट आडव्यातीडव्या मारणाऱ्या पावसाने चिंब भिजून गेली... दूसरी ओला कॅब करावी तर, डेस्टीनेशन नाॅट ऐवेलेबल म्हणे
     दोन पूरूष बाहेर उभे आहेत तेंव्हा "हे कुटुंब आहे कोणी दरोडेखोर किंवा लूबाडण्याचा काही प्रकार नाहीये" असं दाखवण्यासाठी ॠजूता पण माझ्याबरोबर पावसात भिजत बाहेर आली.. तरी कोण थांबायला तयार नाही... मी मनात म्हटलं आता गाडी टोचन करून घेऊन न्यायचाच पर्याय उरलाय, पुण्यात आज राहून मग उद्या जनशताब्दी तिकीट काढूया...

गाडीची प्रस्थान वेळ १६.३५
घड्याळातली वेळ १५.००
उर्वरीत किलोमीटर ६५ अंदाजे..

     आता माझ्या सगळ्या आशा मावळल्या होत्या तेवढ्यात एक टॅक्सी समोर येऊन उभी राहिली मी त्याच्याकडे धावतच गेलो, म्हणाला बसा गाडीत मी सोडतो तुम्हाला... शेवटी एक मराठी माणूसच उपयोगी आला... तो माणूस अक्षरशः देवासारखा धावून आल्यासारखं वाटलं.. पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या.. घड्याळ्यात सव्वातीन होतं होते.. थोडासाच वेळ शिल्लक होता... जर या पुढे ट्रॅफिक लागला नाही आणी आमचं दुर्दैव अजून आड आलं नाही तर कदाचित शेवटच्या क्षणी गाडी पकण्याची शक्यता निर्माण झाली होती...
     ओलाच्या ड्रायव्हर बरोबर पैशाची बोलणी करून आम्ही नवीन गाडीमध्ये बसलो.. पुण्यापर्यंत ओलाचे अठराशे रुपये ठरले होते... आता त्यांने मध्येच रस्त्यात सोडलं... नवीन टॅक्सीवाला हजार रुपये मागू लागला... घासाघीस करण्यासाठीचा वेळ माझ्याकडे नव्हता.... त्या मुळे मी या ओलावाल्याला फक्त आठशे दिले.. म्हटलं "हिशोब पूरा हो गया, टोटल आपको अठरा सौ रुपये दिखा रहा है, हजार मे उसको दुंगा बाकी ८०० आपको दुंगा" , त्याने ओला वाल्यांना फोन केला पण माझ्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे मी लगेच त्याच्या हातावर आठशे रुपये टेकून ताबडतोब नवीन गाडीत बसलो...
     मग मघाचं खेळीमेळीचं वातावरण आता काळजीच्या वातावरणामध्ये बदललेलं... आम्ही घड्याळाचे काटे बघत प्रवासाला सुरुवात केली.. सव्वातीन ते सव्वा चार असा एक तासाचा प्रवास अपेक्षित होता... जर पुढे कुठल्याही प्रकारचा अडथळा आला नाही तर गाडी आपल्याला मिळू शकेल अशी पूसटशी आशा होती... सुदैवाने यापुढचा प्रवास व्यवस्थित झाला आणि आम्ही अगदी साडेचारच्या सुमारास स्टेशनवरती उरलेले पैसे ड्रायव्हरला देऊन सामानासकट प्लॅटफॉर्म नंबर चारसाठी पळतच निघालो...
     गाडीची अनाउन्समेंट झाली होती तिचा प्रस्थान वेळ १६.३५ होतं.. स्टेशन पार करून गाडीपर्यंत पोचचायला आम्हाला १६.३४ झाले.
गाडीत पाऊल ठेवून सामानाची स्थिरस्थावर करेपर्यंत गाडी सुटली. हिच ती एक ते दोन मिनिटे आमचं भविष्य ठरवणारी...
     पुढचा पल्ला टिसीला सामोरे जाणे आणि दुपारच्या व रात्रीच्या जेवणाची भ्रांत सोडवणे हा होता.
     टिसी आला त्याला आम्ही परत सगळं समजावून सांगितलं... तो म्हणे त्याला मुंबईवरून कुठलाही चार्ट मिळाला नाहीये त्यामुळे तो आमच्या तिकिटाची शहानिशा कशी करणार... त्यानं नावं पीएनआर नंबर लिहून घेतला, म्हणाला पुढच्या स्टेशनवर मी चार्ट मागवतो आणि तुम्हाला सांगतो... मनात म्हटलं काय करायचं ते कर आम्ही काय आता गाडीतून उतरत नाही...
     "हे काय उगाच माझं काम वाढलं" असं म्हणत तो चरफडत गेला...
     गाडीने तोपर्यंत वेग घेतला होता आणि दोन-चार स्टेशन मागे सोडली होती... आमचं दुष्टचक्र आता संपलं होतं आणि पुढच्या प्रत्येक स्टेशनवर काही ना काहीतरी खायला घेत आम्ही पुढच्या मार्गाला लागलो होतो...

समाप्त...

शनिवार, २ मार्च, २०१३

अष्टविनायक यात्रा - २१ फेब्रुवारी  ते २३ फेब्रुवारी २०१३

दिवस पहिला - २१ फेब्रुवारी २०१३

महड - पाली - रांजणगाव - हडपसर - पुणे. 
     सुनील नगर डोंबिवली इथे मुक्काम होता, मोबाईल पहाटे साडेपाचला गाऊ लागला आणि आधीच झालेली अर्धवट झोप मोडली. पटापटा आंघोळी उरकून रीक्ष्याने कस्तुरी प्लाझा गाठलं. पंकज आणी राजनदादा अजून आलेच नव्हते, लगेच त्याना फोन गेला, थोड्याच वेळात सर्व एकत्र जमले. घडाळ्यात ७.२५ झाले होते. हिरव्या रंगाची बस 'MH-४३-४७७१६' समोर येवून उभी राहिली. 'राजन आळवे' हे आमचे मार्गदर्शक होते. गावदेवी मंदिराकडे बस १० मिनिटासाठी थांबली फ्रेश होण्यासाठी. ७.४७ ला डोंबिवली सोडल आणी गाडी महडच्या रस्त्याला लागली. ८.४५ ला 'एक्स्प्रेस वे'वरून गाडी पळू लागली. ८.५१ ला खोपोली मागे गेलं. सकाळच्या थंड वाऱ्यामुळे आणी जागरणामुळे डुलकी लागली. ९.२३ ला महडच्या पहिल्या गणपतीच्या मुख्यद्वारातून गाडी आत शिरली. श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी सज्ज झालो. पादत्राणे गाडीतच ठेवून अनवाणी पायांनी देवदर्शन करावं म्हणून त्या डांबरी रस्त्यावरून पायपीट सुरु केली. गाडीचं पार्किंग बरंच दूर असल्याने आणी सवय नसल्याने पायांना खुपणं, भाजणं अनुभवलं. ह्या इथेच फक्त थेट गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. जवळच्या तळ्यात ही  मूर्ती सापडली अस म्हणतात. गाभाऱ्यातून गणरायाचं दर्शन घेवून मग मंगलेश्वर, गुरुदेवदत्त, शनी नवग्रह, करून नाश्यासाठी 'श्रीवरदविनायक धाबा' इथे सोबत आणलेला नाश्ता झाला, शेव भुरभुरून उपमा, कचोरी, तिळाचे लाडू व चहा झाल्यावर १०.३०  ला " गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीरमामा कि जय "च्या गजरात गाडी निघाली ती पालीच्या दिशेने.
     शिळफाटा, खोपोली (१०.४७), देव्न्हाळी (१०.५२), परळी (११.०७), पेडली, सुधागड (११.१८), करत ११.३५ ला पालीच्या दुसऱ्या गणेश दर्शनासाठी तयार झालो. इथे मात्र अनवाणी जाण्याचा अट्टाहास सोडून निघालो. श्री बल्लाळेश्वर दर्शना आधी डाव्या बाजूला असलेलेया धुंडीविनायकाचे दर्शन प्रथम घ्यायचे असते. मंदिराच्या भटजींनी मंदिराचा इतिहास सांगितला. पालीपूरचा एक व्यापारी कल्याणशेठ आणी त्याची बायको इंदुमती, त्यांचा मुलगा बल्लाळ हा श्रीगणेशाचा भक्त होता, मित्रासह जंगलात जावून तो एका मूर्तीची पूजा करत असे, गावकऱ्यांनी त्याची तक्रार त्याचा वडिलांकडे केली. रागावलेल्या वडिलांनी जंगलात जावून बल्लाळाला मारहाण केली आणी ती गणेशमूर्ती फेकून दिली, तीच मूर्ती धुंडीविनायक म्हणून आज पुजली जाते, वडिलांनी बल्लाळाला झाडाला बांधून ठेवले, त्याने मग गणेशाचा धावा सुरु केला, गणपती तिथे अवतरले आणी त्यांनी बल्लाळाला सोडवले आणी त्याच्या इच्छेनुसार पाली इथे वास्तव्य केले. बल्लाळाच्या नावावरून हा श्रीगणेश श्रीबल्लाळेश्वर म्हणून ओळखला जातो. गोष्ट संपल्यावर आरती करून लिंबू सरबत, कोकम सरबत रिचवून आम्ही निघालो.
     आता पोटातल्या कावळ्यांना शांत करण्याची वेळ झाली आणी आम्ही 'हॉटेल रेस्ट इन वन फोरेस्ट'चा आश्रय घेतला. इथे बूफे जेवण होतं - अनलिमिटेड … पापड, लोणचे, डाळ भात, चण्याची आमटी , बटाटा भाजी, गुलाबजामून, ताक असा बेत होता, दुपारी दोनच्या सुमारास पोटातले कावळे शांत झाले आणी आम्ही प्रयाण केलं ते अष्टविनायकातील तिसऱ्या गणपतीकडे…  परळी (२.०७), देवन्हाळे (२.२५), एक्स्प्रेस वे (२.२७), झाल्यावर अडीच वाजता त्या भर उन्हात गाडी थांबली, पासेंजर लिस्ट येईपर्यंत आम्ही सगळे उकडले गेलो. २.५५ ला गाडी सुटली आणी थंड वाऱ्याची झुळूक मन मोहून गेली . ३.०० वाजता खालापूर टोल नाक्यावर टोल भरून निघालो रांजणगावच्या दिशेने. मध्ये मग वि. सी. आर. टोल नाका ( ४.३६) आणी तळेगाव टोल नाका ( ५.४५) पार करत शिक्रापूरहून ६.२० ला रांजणगावात प्रवेश केला. आमच्या सोबत असलेल्या 'जयंत गोगटे दांपत्या'च्या गोड मुलीने, वल्लरी तिचं नाव, कोडी घालायला सुरुवात केली. रंगीत हत्तीच कोडं मस्तच, प्रतुत्तरादाखल पंकज पण कोडी घालू लागला. ह्या कोडी 'सवाल जवाब'मुळे चांगलचं मनोरंजन झालं आणी वेळ कसा गेला ते कळलंच नाही. रांजणगावात पोहचलो ते मावळत्या सूर्याच्या साक्षीने. ह्या मंदिराची कथा तिथे चित्रातून साकारली आहे. एका साधूच्या शिंकेतून जन्मलेल्या त्रिपुरासुराने शंकराची तपश्चर्या करून वर मागून घेतला आणी सोने, चांदी, कांस्य यांचे तीन दुर्ग मिळवले, सोबत अमरत्व पण प्राप्त केलं, मग तो देवांना, साधूंना छळू लागला, सर्व देव शंकराला शरण गेले, त्रिपुसुराला मारण्यासाठी नारदाच्या सांगण्यावरून श्रीशंकराने श्रीगणेशाची पूजा केली आणी त्रिपुरासुराचा युद्ध करून वध केला अशी आख्यायीका आहे. ह्या मंदिराची बांधणी अशी करण्यात आली आहे कि सूर्याचे किरण थेट मूर्तीवर पडतील. मूळ मूर्तीला १० सोंडे आणी २० हात असल्याचे सांगितले जाते. ह्या तिसऱ्या गणपतीचे - श्रीमहागणपतीचे दर्शन घेवून आम्ही बाहेर आलो. चहा घेत घेत गाडी बिघडल्याची बातमी कानांवर आली, तासा दीड तासासाठी गाडी दुरुस्तीसाठी गेल्याचं कळलं, 'मंगलमुर्ती टी सेंटर'मध्ये चहा, उसाचा रस, वडापाव, मिसळ पाव वगेरे खाल्यावर आणखी उशीर होणार असल्याच कळलं. जवळच्या हॉटेलात मग खिचडी आणि पुलावचं जेवण केलं, न जाणो रात्री किती वाजता पोहचू आपल्या निवास्थानी…. इथे बऱ्याच जणांच म्हणणं होतं कि गाडी दुरुस्ती, हॉटेल वर गेल्यानंतर करावी पण गाडी रस्त्यात अचानक बंद पडण्याचा धोका कसा काय घेणार …. शेवटी रात्री १ ० वाजता दुरुस्त झालेली गाडी दिसली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. 
     १०.३० ला परत टोल भरून गाडी हडपसरच्या जवळ असणाऱ्या 'हॉटेल मल्हार'ला ११.२० ला पोहचली, १०२ , २०४  व २०५ अश्या ३ खोल्या ताब्यात घेतल्या, गरम गरम भजीचा खमंग वास सुटला होता, खरं तर भूक नव्हती पण त्या वासाने भूक चाळवली आणी पाय तळ मजल्यावरच्या बुफे जेवणाकडे आपोआप वळले. श्रीखंड, चपाती, डाळ भात, पालक पनीर, भेंडी भाजी, पापड, गाजर बिट मुळा कोशिंबीर इ. हादडून झोपायला गेलो. १०२ नं च्या रूम मध्ये आई अमु , २०४ मध्ये मी ऋजुता अवनी, २०५ मध्ये पंकज राजनदादा अशी विभागणी झाली. 

दिवस दुसरा - २२ फेब्रुवारी २०१३

थेऊर -सिद्धटेक - मोरगाव- जेजुरी- पुणे - हडपसर
     ठरल्या प्रमाणे ६.३० ला दरवाज्यावर टकटक  झालं, 'बेड टी' दिला गेला आणी आम्ही उठून तयारी केली. गरम पाण्यासाठी वणवण हिंडावं लागलं, खोलीत गरम पाण्याचा नळ होता पण त्याला थंडच पाणी येत होतं, हे हॉटेल बाहेरून पॉश दिसत असलं तरी आतून मात्र बोंबच होती. कुणाकुणाच्या खोलीत तर गरमच काय, थंड पाणी सुद्धा येत नव्हत, राजनदादाने म्हणे बिनपाण्याची केली …. सर्व दरवाज्यांच्या कड्या सोनीवरच्या सीआयडीच्या 'दया'ने तोडलेल्या… पंख्याचा स्पीड कंट्रोल - आउट ऑफ कंट्रोल झालेला… तिथे असणारा एक वाघासारखा दिसणारा एक पाळलेला उंच धिप्पाड 'भू भू' अवनीला मात्र जाम आवडला… ७.३० पर्यंत सगळे जमले आणी रिसेप्शनमध्ये अजून एक चहा झाला.
     ८ वाजता बरोबर " गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीरमामा कि जय "च्या गजरात गाडी निघाली. हडपसर (८.११), फुरसुंगी (८.१३), पुणे (८.१८), सासवड रोड (८.२२), कवडीपाद टोल नाका, करत ८.५० ला थेऊरला गाडी पोहचली. पेशव्यांनी या मंदिराची बांधणी केली होती आणी माधवराव पेशव्यांनी इथच प्राण त्यागले असे म्हणतात, सती गेलेल्या रमाबाईंचं स्मारकसुद्धा इथे आहे. मुंजाबा, दक्षिणमुखी मारुती, शंकराचे मंदिर अशी देवळे इथे परिसरात आहेत. दर्शनानंतर 'श्री हॉटेल' इथे सोबत आणलेला नाश्ता आणी चहा झाला. शेव घातलेले थंड पोहे, सामोसा कचोरी असा नाश्ता झाला. ९.५७ ला थेऊर सोडलं.
     थेउर सोडलं आणी अंताक्षरीला सुरुवात झाली, बस मधले पुढच्या सिट्स वि. मागच्या… जबरदस्त मजा आली… कोणतेही नियम लागू नाहीत, अगदी गाणं अंतऱ्या पासून सुरु करा किंवा मुखड्यापासून, मराठी हिंदी काहीही चालेल. गोगटे,गद्रे, वैद्य आमच्या टीममध्ये असल्याने आमची टीम प्रबळ होती. मग वैद्यना पुढच्या टीम मध्ये पाठवलं. गाणी म्हणून घसा सुकला पण कुणी हार मानायला तयार नव्हतं, कुठून इतका स्टोक आला होता कुणास ठाऊक… १०.०९ ला SH - ५६, सोलापूर रोडवरून गाडी पळत होती. उरळी कांचन (१०.४८), कासुर्डी टोल नाका (१०.२८), चौफुला (१०.४८), पाट्स, गिरिम (११.२५), दौंड (११.२५), देऊळगाव (११.४०) मागे टाकून सिद्धटेकला ११.५० ला पोहचलो. पाचवा गणपती सिद्धटेक चा सिद्धीविनायक ….उजव्या सोंडेचा हा गणपती फार जागृत मानला जातो, होळकरांनी ह्या मंदिराची पायाभरणी आणी विस्तार केला. मंदिराची प्रदक्षिणा १ किमी लांबीची आहे आणी ती बाहेरून करावी लागते. अर्थात दुपारच्या रणरणत्या उन्हात पंकज आणी राजनदादा सोडून इतर कुणीही ह्या प्रदक्षिणा करायच्या फंदात पडल नाही. आमचा जेवणाचा कार्यक्रम इथे एका भटजींच्या घरात होता. पंगत बसली आणी दुपारच जेवण इथे घेतलं, चपाती, डाळ भात, मुगाची उसळ, फ्लॉवर बटाटा भाजी, गोड शिरा, ताक असा बेत होता. जेवणाच्या आधी गुरुजींनी या गणेशाची कथा सांगितली, मधु आणी कैथभ ह्या असुरांच्या नाशासाठी भगवान विष्णूने इथेच श्रीगणेशाची पूजा केली अशी आख्यायिका आहे, मोरया गोसावी यांनी इथेच गणेशाची आराधना केली होती. १.१५ ला गाडी निघाली ती मोरगावसाठी … 
     पुन्हा दौंड (१.४३), पाट्स (२.०५), चौफुला (२.२३), मयुरेश्वर अभयारण्य , सुपे (२.४२) करत मोरगावला २.५५ ला गाडी पोहचली. लांबून हे मंदिर त्याच्याभोवती असलेलेया चार मिनारामुळे एका मशिदीसारख दिसतं,  मुघलांच्या हल्यांपासून वाचवण्यासाठी अशी अशी खास रचना करण्यात आली होती. मोरावर स्वार झालेल्या या गणेशाचं नाव पडलं मयुरेश्वर. इथे एक नंदी आहे मंदिराच्या आवारात. अस म्हणतात कि एका शिवमंदिरातून ह्या नंदीची मूर्ती हलवत असताना ती नेणारी गाडी तुटली आणी हा नंदी तिथेच राहिला, कुणाला तो हलवता येईना आणी तेंव्हा पासून तो इथेच आहे. दु ३.४८ ला उसाचा रस पिउन सगळे निघाले ते जेजुरीसाठी …खंडोबाच्या दर्शनाला…
     ४.०७ वा जेजुरीच्या पायथ्याशी पोहचलो, " जय भवानी, जय शिवाजी ", म्हणत त्या किल्ल्याच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. इथे डोलीची पण व्यवस्था आहे, माणशी ६०० रु त…डोली घेवून जाण्याचा रस्ता मात्र दुसरा आहे, हा रस्ता डोंगराच्या दुसऱ्या बाजूने जातो. आई खालीच थांबली, नावाला ५ - १ ० पायऱ्या चढून ती त्या पायऱ्यांवर बसली आणी आम्ही जवान लोक किल्ला सर करायला निघालो. जास्त दमछाक होवू नये म्हणून अवनीला आळीपाळीने घेण्याचं ठरलं. मी चढताना पायऱ्या मोजत होतो, ४५ व्या पायरीवर 'दमछाक'रुपी शत्रुचा सामना झाला, 'पाणी'रूपी  हत्यारांनी त्याचा पराभव करून पुढे निघालो. १९० व्या पायरीवर पुन्हा हल्लाबोल झाला, थोडं 'घाम'रुपी रक्त सांडलं, पण सरशी आमचीच झाली, सोबत बरेच शिलेदार होते. लाल रंगाची 'टोपी'रुपी शिरस्त्राण घातलेले सैनिक लढताना आणी पुढे कूच करताना दिसत होते. २९० व्या पायरीवर शेवटच्या अटीतटीच्या लढाईला तोंड फुटलं आणि आम्ही शत्रुचा पराभव करत किल्ल्यावर कब्जा केला. तिथे असलेली 'काकडी'ची रसद लुटली, ३५२ पायऱ्या चढून आम्ही खंडोबाच्या दर्शनाला रांग लावली, हा पूर्ण भाग हळदीने पिवळा झाला होता.  इथे भाविक लोक हळदीचा भंडारा करतात, कसेबसे कपडे डागाळण्यापासून वाचवत आम्ही गाभाऱ्यात शिरलो आणी दर्शन घेवून बाहेर आलो. सरदार पानसे यांनी देवाला अर्पण केलेली ९ शेर वजनाची म्हणजे ४२ किलोची तलवार इथे पहायला मिळते, या तलवारीच्या कसरतीच्या आणी तलवार उचलण्याच्या स्पर्धा विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी गडावर संपन्न होतात, गडाचा इतिहास इथे लिहून ठेवलेला आहे.  इ. स. ८ व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे पुरावे मिळतात १३ व्या शतकात वीरपाल विरमल्ल यांनी हा गड बांधला, शके १५५३ मध्ये राधे बम्बाजी खटावकर, १५६८ मध्ये आप्पाजी पुवशी, १६६४ मध्ये गोविंद कुलकर्णी, श्रीगोंदेकर, १६८० मध्ये तुकोजी होळकर, श्यामजी राजपूरकर, १७६० ते १७७८ मध्ये अहिल्याबाई होळकर इ मराठा सरदारांनी मुख्य गाभारा बालदारी, दिपमाळा, गडाची तट बंदी व वेशींचे काम केले. या गडाला ९ लाख दगड वापरून एकूण ४५० पायऱ्या, १८ कमानी व ३०० दिपमाळा आहेत. 'फोटो'रूपी झेंडा रोवून आम्ही उतरण्यास सरुवात केली आणी  ६ . १ ० वा गाडी निघाली प्रतीबालाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्यां बालाजी मंदिराकडे … 
      ६.१८ ला HP पेट्रोल पंपावर गाडीत खाद्य भरलं आणी गाडी सोडली. इथे बंद असणाऱ्या वोटर फिल्टर मधून येणाऱ्या पाण्याने बाटल्या भरून घेतल्या फक्त " पिण्याचे पाणी" ह्या बोर्डावर विश्वास ठेवून…  ६.५५ ला सासवड मागे टाकून  ७.३० ला बालाजी मंदिरात प्रवेश केला. इथे मोबाईल, चामड्याची पर्स, केमेरा वगेरे घेवून जाता येत नाहीत. म्हणून आम्ही ह्या गोष्टी गाडीतच ठेवून निघालो दर्शनाला… चपला स्टेन्डवर चपला जमा करून 'हेंडीक्याम' दरवाज्यावर जमा करून टोकन घेतलं. त्या भव्य मंदीराच्या सुंदरतेने डोळे दिपले, इतकं स्वछ मंदिर कि कुठे धूळ पण दिसायची नाही. गर्दी नाही कि कुठे रांग नाही, शांत स्वछ व सुंदर, पायच निघत नव्हता पण करतो काय ८ ला मंदिर बंद करतात. तेंव्हा निघावच लागलं, ८.३५ ला बस निघाली ९.४० ला पुन्हा 'हॉटेल मल्हार'वर परत आलो आणी जेवणासाठी सज्ज झालो. चपात्या, डाळ, जिरा राइस, फ्लॉवर बटाटा भाजी, वांगी भाजी, दही वडे, काकडी गाजर कोशिबीर, पापड इ. चा आस्वाद घेतल्यावर झोपण्यासाठी रूमवर आलो. 

दिवस तिसरा - २३ फेब्रुवारी २०१३

     पहाटे ५.३० ला दरवाज्यावर टकटक झालं  आणी बेड टी मिळाला, रूम सोडायची असल्याने तयारी सोबत सामानाची बांधाबांध पण होती, कालच्या अनुभवावरून शहाणा होत गरम पाण्यासाठी पहिला नंबर लावला आणी आंघोळी उरकून ७.१५ ला सामानासकट खाली उतरलो, सामान गाडीत गेलं आणी आम्ही हॉटेलचा आणी पर्यायाने पुण्याचा निरोप घेतला. ७.३५ ला गाडी निघाली. फुरसुंगी ( ७.४९), हडपसर ( ७.५३), बंड गार्डन (८.१८), येरवडा (८.१८), संत ज्ञानेश्वर महाराज पथ (८.२०) मागे टाकून 'देवाची आळंदी'ला ८.४३ ला आलो. इंद्रायणीकाठी वसलेल्या या गावात संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती. या ठिकाणी आता त्याचं मंदिर आहे. ९.३० ला दर्शन घेवून 'रमेश टी सेंटर'ला नाष्ट्यासाठी जमलो. मिसळपाव आणी भाकरवडी असा चमचमीत मेनू होता, मिसळपाव हैदराबादला मिळत नसल्याने मी त्यावर तुटून पडलो. ३ -४ प्लेट रिचवल्या असतील. पोटभर आणी  मनसोक्त नाश्ता झाल्यावर १०.३० ला गाडी निघाली ती ओझरच्या दिशेने… 
     नाशिकरोडवरचं चाकण १०.५३ ला मागे गेलं. तळेगाव चौक (१०.५८), मंचर (११.१९), कळंब (११.४७), नारायणगाव (११.५८), करत १२.३५ ला ओझरच्या गणरायाला भेटायला जीव आसुसला. कुकाडी नदीवरून येणाऱ्या वाऱ्याची थंड झुळूक अंगावर झेलत मंदिराच्या आवारात प्रवेश केला. चारही बाजूला उंचच उंच दगडी भिंत आहे आणी मधोमध मंदिर आहे. मूर्तीच्या डोळ्यात माणकं आणी कपाळावर हिरा आहे. चिमाजी आप्पान्नी मंदिरावर सोन्याचा कळस चढवला आहे. श्रीगणेशाने विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा पराभव केला आणी शरण आलेल्या असुराला क्षमा करत " गणेशपूजा जिथे होत असेल तिथे तू जायचं नाही " अश्या अटीवर माफी दिली, ह्या असुराच्या नावावरून श्रीगणेशाला विघ्नेश्वर असं नाव प्राप्त झालं, अशी आख्यायिका आहे. कंदी पेढे इथे चांगले मिळतात असं  त्या राजन आळवेन्नी सांगितल्यामुळे प्रसादाची खरेदी इथे झाली. १.३५ ला लेण्याद्रीचा डोंगर दिसू लागला. 
     डोंगराच्या पायाथ्याशी एका हॉटेलाशेजारी जेवण बनवण्याचं सामान उतरलं आणी आम्ही पुढे निघालो. २.१७ ला लेण्याद्रीच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली . दुपारचं रणरणत ऊन त्यात समोर तीनशेसात पायऱ्या, आडोश्याला एक पण झाड नाही की कुठलीही सावली नाही, पोटात फक्त सकाळचा नाश्ता, तोंडाला पडलेली कोरड, तीव्र चढणीच्या पायऱ्या, वाटेत कुठे थांबल्यास भटक्या माकडांचा त्रास, अश्या अवस्थेत मनाचा हिय्या करून चढण्यास सुरुवात केली, दुपार असल्याने माकडे तशी नव्हती, सोबत चांगल्या ५ पाण्याच्या बाटल्या घेतल्या होत्या, नाश्ता जोरदार केला होता म्हणून चढण्याच त्राण होती, उनाचा सामना करणारी 'सुयोग ट्रेवल'ची तो टोपी डोक्यावर होतीच, तासाभरात दरमजल करीत ३०७ पायऱ्या चढून त्या गुहेत शिरलो आणी पाण्याची बाटली डोक्यावर रिकामी केली. इथे म्हाताऱ्या लोकांसाठी किंवा ज्यांना चढता येत नाही त्यांच्यासाठी डोलीची व्यवस्था सुद्धा आहे. ५०० रु मोजावे लागतात मात्र…आईसाठी एक डोली ठरवली आणी तिला आधी पाठवून दिलं, एका चौकोनी 'कठहरे' मे बसवून ४ लोक खांद्यावरून उचलून नेतात आणी तेच खालीपण आणतात, पैसे मात्र खाली आल्यावरच द्यायचे. आमचा अष्टविनायकातील आठवा आणी शेवटचा गणपती … लेण्याद्रीचा गिरिजात्मक, गिरीजा म्हणजे पार्वती, आणी आत्मज म्हणजे मुलगा, हिमालयगिरीची मुलगी पार्वती, तिने आपल्याला पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात तपश्चर्या केली, आपले मन एकाग्र व्हावे म्हणून तिने एक मातीची बालमूर्ती बनवली. तिची तपश्चर्या फलद्रुप झाली आणी श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बाल रुपात प्रकट झाले, म्हणून त्याला गिरिजात्मक अस नावं मिळालं, मग या गणेशाने बालासुर,व्योमासुर,शत महिशा, कमलासुर, मंजकासुर, अश्या अनेक असुरांचा नाश केला. आजूबाजूला काही बौद्ध लेणीसुद्धा आहेत. जीर्णापूर व लेखनपर्वत असेही ह्या ठिकाणाला ओळखले जाते. येथील लेण्यांना गणेशलेणी म्हणतात. ह्या लेण्यात एक बौद्ध स्तूप आहे, त्यास भीमाची गदा म्हणतात, हे स्थान लेण्यात आहे म्हणून या डोंगराला लेण्याद्री असे नाव प्राप्त झाले. संपूर्ण भारतातील गुहांमध्ये लेण्याद्री हा गुंफासमूह सर्वात मोठा आहे, इथे एकूण २०० गुहा आहेत, याची निर्मिती इ.स.पुर्व ३ रे शतक ते इ.स ३ ऱ्या शतकात झाली.  गुहा नं ७ हि इथली सर्वात मोठी गुहा आहे, पुरातत्व विभागाने हा गुहा समूह राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित केला आहे. 
     अष्टविनायकदर्शन पूर्ण झालं, गणपतीची आणी त्यानंतर अष्टविनायकाची आरती झाली, निघताना मन जड झालं, यात्रा संपल्याची हुरहूर लागून राहिली, पाणावलेल्या डोळ्यांनी पायऱ्या उतरण्यास सुरुवात केली. ४.०३ ला पुन्हा डोंगराच्या पायथ्याशी आलो. तिथून बस खाली होटेलाकडे आली. अनलिमिटेड बुफे जेवण पुन्हा अनुभवलं, खुल्या हवेत हिरवळीवर खुर्च्या मांडून झाडांच्या सावलीत निसर्गाच्या सानिध्यात पुरी, बटाटा भाजी, छोले, पुलाव, डाळ, गाजराचा हलवा, असं जेवण घेतलं. ५.४५ ला परतीचा प्रवास सुरु झाला. ६.२० आळेफाटा, माळशेज घाटावर चा सूर्यास्त, 'टोकावडे' ७.२०, करून 'हॉटेल प्रांजली'ला चहा झाला.  ८.१५ ला मुरबाड ८.५७ ला शहाड, ९.१० ला कल्याण, ९.३५ ला टिळक चौक डोंबिवलीला गाडी आली. रीक्ष्याने सुनीलनगर गाठलं आणी अष्टविनायक यात्रा पूर्ण झाल्याचं समाधान घेवून शांतपणे झोपी गेलो.

रविवार, २३ ऑक्टोबर, २०११

माझं पाहिलं प्रवासवर्णन ११ वर्षांपूर्वी लिहिलेलं......

नाशिक - त्रंबकेश्वर - शिर्डी - शनीशिंगणापूर मिनी दौरा
पहिला दिवस                                               ३० एप्रिल २०००                                                    रविवार
गजराच घड्याळ पावणेचारला ओरडलं आणी त्याने आम्हाला जागं केलं, मी सवाचारला उठलो. पाच वाजेपर्यंत सर्व तयारी झाली. ५.३० ला गाडी आली व प्रवासाला सुरुवात झाली. तेरा माणसे मावू शकतील अशी एक TRAX आम्ही केली होती. कल्याण स्टेशन (५.५०), काळा तलाव ( ६ .००), लाल चौकी ( ६.०६ ), दुर्गाडी किल्ला (६.०७) करीत गाडीला डीझेल भरवलं. काही वेळातच भिवंडीबायपास मेनरोडवरून उजव्या दिशेला नाशिककडे गाडी पळू लागली. भोईरपाडा, आर्जोली, पडघा, पड्गाव, कोशिम्बी, पाली, वाशिंद, दहागाव, आसनगाव मागे टाकत ७.०२ ला शहापूर गाठलं. कळंभे, आवरे, आरगाव, कानविंदे, उमरखाड, घाम्नी, गोल्भान, शिरोळ, करत कसारा ७.४२ ला ओलांडल, चिंतामणवाडीनंतर कसाऱ्यात चहा नाश्तासाठी थांबलो. ८.३६ पर्यंत बटाटवडे पोटात रिझवले. इथे प्लानमध्ये थोडी सुधारणा झाली. त्रंबकेश्वर ,मुक्तिधाम करत संद्याकाळी शिर्डीला पोहोचायचं ठरल.
८.४५ ला इगत पुरीच्या घाटाला सुरुवात झाली. थोड्या ट्राफिक मुळे ९.४५ ला घाट संपला. मला घाटामुळे आणी पेट्रोलच्या वासामुळे मळमळायला होत होतं. कसाऱ्याचे बटाटवडे बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले. १०.१० ला मेन रोड वरून त्रंबकेश्वरसाठी आत वळलो आणी अचानक प्रणवचे बटाटवडे बाहेर पडले. गाडी थांबवून ऐवोमीनच्या गोळ्या आम्हा सर्वांच्या पोटात पडल्या.निर्जन ओसाड द्राक्ष मळे पहात १०.५५ ला त्रंबकेश्वर गाठलं.
" हिंदुं व्यतिरिक्त इतरांना सक्त मनाई आहे " हा बोर्ड वाचून मंदिरात प्रवेश केला. भली मोठी, पायांना चटके देणारी रांग पाहून हैराण झालो. २-३ तास इथं घालवण अशक्य आणी अतर्क्य वाटू लागल्याने एका गजातून श्रीत्रम्बकेश्वराच दर्शन घेवून ११.५५ ला त्याचा निरोप घेतला. वाटेवरच्या द्राक्षमळ्यामुळे द्राक्षखरेदीसाठी गाडी थांबवली. १२ किलो द्राक्ष विकत घेत पंचवटीला प्रयाण झालं. दुपारी १ वाजता गोदावरी घाट गाठला. शेवाळयुक्त पाणी बघून १.२५ ला मुक्तीघाम साठी गाडी सोडली.
१.४८ ला मुक्तिधाम ला पोहचलो. सर्व देवांच्या समावेशामुळे मंदिराला मुक्तिधाम असं नाव पडल असावं.संगमरवरी दगडांच शांत आणी सुंदर मंदिरात जावून खरोखरच मुक्ती मिळाल्यासारख वाटत होतं. जेवण तिथच घ्यायचं होतं पण जेवणाचे आकाशाला भिडलेले भाव पहाता श्रीखंड व बर्फाचे गोळे खात पुन्हा निघणार तोच आर टी ओ आडवा आला, त्याला 'चहापाणी' दिल्यावर २.४० ला तिथून निघालो. पळसे व मोहदरी घाट मागे टाकला व हॉटेलचा शोध सुरु झाला.३.२० ला एका हॉटेलात मशरूम मसाला व कोल्हापुरी वेज सोबत पुऱ्या व रोट्यावर ताव मारला. ४.१५ ला शिर्डीच्या दिशेने गाडी सोडली. ५.१० ला डीझेल भरल व दहा मिनिटात शिर्डी गाठलं. खोलीचा शोध सुरु झाला. देवळाच्या बाहेरच एका हॉटेलात खोली बुक झाली आणी ६.४५ ला खोलीत सामान विसावलं. एक खोली, २ माणसांचा बिछाना, एक टेलिकॉम, आरसा कोपरयातली टिपोयवरची ७-८ गाद्यांची चळत, बेसिन व बाथरूम असा प्रकार होता.थोडं ताजेतवाणे झाल्यावर साईदर्शनासाठी निघालो.
७.४० वा पहिल्या मजल्यावर रांगेला सुरुवात झाली. आरतीसाठी मध्येच प्रवेश बंद झाला. दीड तासांच्या रांगेतल्या येराझाऱ्यानंतर ९.१० ला साईबाबांचं दर्शन झालं. गाभाऱ्यात अगदी थंडगार वाटत होतं. बाहेरच्या मशीनवर नारळ फोडला व प्रसादाच्या जेवणाचे वेध लागले. पायपीट केल्याने पोटात कावळे ओरडत होते त्यामुळे ड्रायव्हरला न घेताच ९.३५ ला जेवण्याच्या रांगेतून येराझाऱ्या सुरु झाल्या. राजनदादाने जेवणाची कुपन घेईपर्यंत आम्ही खूप पुढे गेलो होतो.त्यामुळे राजनदादा आणी पप्पांना येराझाऱ्या बायपास करून यावं लागलं. १० वाजे पर्यंत जेवण संपलं व त्यानंतर दिलीपभावोजी ड्रायव्हरला जेवायला घेवून गेले, आम्हा सर्वांचा जेवणाचा खर्च ४० रु व ड्रायव्हरचा एकट्याचा ९० रु झाला. असो, रात्री ११.१५ ला दिवे मालवले.

दूसरा दिवस                                       १ मे २०००                                  सोमवार
रात्रभर डासांमुळे नीट झोप आली नाही पण पहाटेला लागली. ७.२५ ला जागा झालो. ८.३० ला आंघोळ करून स्यांडविचेस चा नाश्ता झाला. ९.३० ला घरातून प्रयाण झालं. प्रथम उदी घेतली. मुख दर्शन, गणेश, शनिदेव, महादेवदर्शना नंतर गुरुदर्शन ( लिंबाच झाड ), रखमाई मंदिर, समाधी स्थळ, चावडी करून ११.३० ला प्रसादाच्या जेवणासाठी रांग लावली. यावेळेला ड्रायव्हरला सोबत नेलं होतं. साईबाबांच्या ह्या गावात एकदम प्रसन्न वाटत होतं.
१२.०५ ला खोलीवर बांधाबांध करून १२.३० ला खोली आणी शिर्डी सोडली. राहुरी, उंबरे गाव, व नेवासे मागे टाकत अहमदनगरत प्रवेश झाला. मध्यंतरी गाडीच्या सायलेन्सरमध्ये खराबी झाली होती.तो थोडा त्रास देवू लागला होता, सोनमुळा इथे वेल्डिंग करून घेत २.५५ ला शनीशिंगणापूर गाठलं.
फक्त पुरुषांनीच आंघोळ करून भगव्या कपड्यानिशी तेलाने शनीदेवाला आंघोळ घालून पूजा करायची असते. शानिश्वराचा शक्तीखडक उनात असतो. स्त्रीयांना तिथे जाण्यास बंदी आहे. देवळात २-३ संताच्या व देवांच्या मूर्त्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे घरांना दरवाजेच नाहीत, एक किराणा दुकान होतं त्याला सुद्धा शटर नव्हतं कारण इथे चोरी होत नाही आणी कोणी जर केली तर तो माणूस वेडा होतो भरकटतो असं त्या शनीश्वराचं महात्म्य आहे. उसाचा रस आणी बर्फाचा गोळा खावून ३.४५ ला तिथून निघालो, येताना जवळचा रस्ता धरला. साडेचारला राहुरीला परतलो. मध्ये न थांबता संगमनेरसाठी गाडी सोडली.
४.५५ ला कोल्हार, ५.०५ ला लोणी करत साडेपाचला संगमनेर मध्ये पाउल ठेवलं. ५.५० ला एका नदीपाशी चहापानासाठी गाडी थांबवली. नदी तशी मोठी नसली तरी पाणी पुष्कळ होतं. मी शुभाताईसह मुलांना घेवून नदीच्या काठावर पोहचलो. नदीच्या प्रवाहातले गूळगुळीत झालेले दगड पुन्हा पाण्यात फेकत, हात पाय धुवून ताजेतवाने होत ६.१० ला गाडी निघाली. चंदनपुरी, एकल घाट मागे टाकत ७.०० वा ' बोटा ' मागे टाकलं.
आळेफाट्यावरून ७.१० ला गाडी कल्याणच्या दिशेने निघाली. वडगाव, उंबर, पिंपळेवाडी, घनगरवाडी मागे टाकत ७.२० ला गाडीला शेवटचा घास भरवला कारण पूढे खराब रस्त्याला सुरुवात होणार होती.
एव्हाना सूर्यास्त झाला असल्यामुळे त्या काळोख्या खडबडीत रस्त्यावरून गाडी डूचमळत जात होती. थोड्यावेळाने दऱ्या लागल्या, सभोवार काळा कुट्ट काळोख, दोन्ही बाजूला डोंगर गर्द झाडी, रिकामा रस्ता पाहून मनात धस्स झालं. दूरपर्यंत प्रकाशाचा एकही किरण नाही, रस्तावर एकही वाहन नाही, अथवा बोर्ड नाही अश्या रस्त्याला संपायला एक तास लागला. ८.३० ला आमचा जीव भांड्यात पडला आणी जीवात जीव आला. दूरवर प्रकाशाचे दिवे लुकलुकताना दिसले, हा संपूर्ण ओतूर बाग ओलांडायला ८.३५ झाले. हा रस्ता संपला आणी एतिहासिक माळशेज घाटाला सुरुवात झाली. एक पिकनिक स्पॉट असलेला हा घाट कधी संपतो अस झालं होतं. अंग आखडून गेलं होतं. गाडीतल्या गाडीत हालचाल कशी करणार. त्यात पायाकडे सामानाची बोचकी आल्यामुळे परीस्थिती फार वाईट झाली.
रस्त्यावर गाड्या नसल्यामुळे कल्याणला जाताना प्रवास फार वेगात झाला. ९.५५ ला कल्याणच्या मुरबाड रोडवरून गाडी पळत होती. ब्रिज ओलांडून डोंबिवलीच्या एम. आय. डी. सी. एरियात प्रवेश केला, आता ओळखीचा रस्ता सुरु झाला. १०.३० ला गाडी गुरुकृपा समोर थांबली. आखडलेले हात पाय मोकळे झाले. तोपर्यंत टपावरच सामान पण खाली आलं. शुभाताईकडे सर्व सामान ठेवलं, मम्मी पप्पा चालत घरी गेले. मी सुद्धा पायागाडी वरून घरी परतलो.
येताना अंधारामुळे रस्त्यावरची गावे लिहू शकलो नाही. अर्थात काळोखात अंदाजाने मी जी गाव लिहिली ती माझी लिपी वाचण्याजोगी नव्हती. घरी आल्यावर जेवणाची कुणाचीही इच्छा नव्हती. गपागोष्टी व प्रवासवर्णनाच्या सविस्तर कथाकथनानंतर झोपायला साडे बारा वाजले, अंग दुखत असल्याने झोप १ वाजता आली असणार हे ओघाने आलच !

सोमवार, ५ एप्रिल, २०१०

युद्धमोहिम जोधपुरपर्यंतची

जोधपुर प्रयाण / युद्धमोहिम जोधपुरपर्यंतची...
गेल्या वर्षीच्या दक्षिण भारताच्या यशस्वी मोहिमेनंतर आता आम्ही आमचा मोर्चा उत्तर पश्चिम भारताकडे वळवला. राणे महाराजांच्या नेतृत्वाखालील " वैष्णोदेवी मित्र मंडळ " च्या झेंड्याखाली एकत्र येवून, उत्तर भारत काबीज करण्याच्या मोहिमेची आखणी बऱ्याच दिवसापासून चालली होती. याआधी ३ महिन्यांपूर्वी बेंगलोर, हैदराबाद, गोवा अशी राज्ये काबीज केल्यानंतर आता राजस्थान, जम्मू आणी त्यानंतर थेट दिल्ली काबीज करण्यासाठी घरातल्या देवांच्या साक्षीने प्रस्थान केलं.
बांद्रा रेल्वे टर्मिनल्स हा पहिला पडाव होता. त्यासाठी सुमो नामक एक घोडा ठरवला होता.हा आम्हास घेवून बांद्र्यास सोडणार होता. दुपारी ठीक ३ च्या घटकेस आम्हास तेथे पोहचायचे होते.सर्व युद्धास लागणारी सामग्री काल पासूनच तयार ठेवली होती. तब्बल पाच तोफा सज्ज होत्या. कपडे, सामान सदृश्य दारुगोळा त्यात ठासून भरला होता. खाण्यापिण्याची भरपूर रसद बरोबर घेतली होती. न जाणो कोण्या शत्रूने आमची रसद अडवली तर.... निदान काही दिवसांची तरी सोय आपल्याबरोबर असावी...
"आम्ही घोडे घेवून तूर्तास निघत आहोत ", शिलेदार जोशी यांचा संदेश ' मोबाइल ' नामक राजदुताद्वारे मिळाला. आम्ही आमच्या तोफा किल्ल्यातून बाहेर काढल्या आणी किल्याच्या राजद्वारापाशी घोड्याची वाट पहात थांबलो. थोड्याच वेळात शिलेदार जोशी आम्हास येवून मिळाले. त्या सुमो नामक घोड्यास एक टाच मारून ' डोंबिवली पश्चिमे' कडे कूच केले. मोकाशींच्या तोफांचा ताफा आम्हास येवून मिळाला. रस्त्यातच पुढे ' सिंग ' नावाच्या शिलेदारास सोबत घेतले आणी आमच घोडे बेफाम दौडू लागले. ' इस्टर्न एक्सप्रेस हायवे ' या राजपथावरून दौडत निघालो. वेळेच्या आधी अर्धा तास पोहचलो. वजनाने जड असणाऱ्या तोफा चालवत आम्ही स्टेशन वर येवून तळ ठोकला. थोड्याच वेळात 'रणकपूर एक्सप्रेस' नामक रथात आरूढ झालो. या रथाला बरेच नव्या दमाचे घोडे जोडलेले होते. रथाचा सारथी ठीक सव्वातीनच्या घटकेला रथ चालू करणार होता. इथ अनेक ठिकाणाहून आलेले राजे रजवाडे, शिलेदार, किल्लेदार, सुभेदार, आम्हास येवून मिळाले. आतापर्यंत आमच सैन्य बरच मोठ झालं होतं. ह्या सर्वांना राणेनी एकत्र केलं आणी रथात बसायच्या जागा समजावून सांगितल्या. एस फोर च्या ४,५,व ६ या जागा आमच्यासाठी राखीव होत्या आणी आम्ही आसनस्थ झालो. तोफा बैठकीखाली लपवून ठेवल्या. रस्त्यात शत्रूने जर गाठलच तर त्याला आमच्या शक्तीची कल्पना येवू नये. ठीक सव्वातीन ला रथ हलला, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली करत बोरिवलीला थांबला. इथे आणखीन काही शिलेदार चढणार होते. 'खेतवानी' इथ त्याच्या तीन तोफा घेवून चढला. आसनाखाली जागा नसल्याने त्याने वरच्या आसनावर त्याच्या तोफा ठेवल्या. आम्ही एकमेकांना हस्तालोन्दन केलं आणी पुढील हल्ल्याची आखणी केली. पावणेचारला रथ पुन्हा दौडत निघाला. दहीसर, मिरारोड, भायींदर, नायगाव, वसई रोड करत सव्वाचारला विरार आलं. आतापर्यंत आम्ही आमच्या हद्दीतून बाहेर आलो होतो आणी अनोळखी प्रदेश इथून सुरु होणार होता.
थोड्याच वेळात कळलं की आमच्यावर हल्ला झाला होता. शत्रूने नकळत आमच्यावर हल्लाबोल केला आणी नव्या प्रदेशात शिरताच आमचा रथ अडवला. आम्ही सर्व सैनिक, लढाईला अचानक तोंड फुटल्याने भांबावून गेलो. सर्व शिलेशिपाई खाली उतरले आणी तुंबळ युद्ध केलं. तब्बल तासभर लढाई चालली. त्या 'सिग्नल' रुपी शत्रूने आम्हाला चांगलीच टक्कर दिली. चिवट प्रतिकारानंतर अखेर आमची सरशी झाली आणी आम्ही आमचा रथ पुढे दामटला. पहिल्याच हल्याने खूप नुकसान केलं होतं. आमचे घोडे जखमी झाले होते. रथाचा वेग मंदावला होता. हा असाच वेग राहिला तर पुढे कसं होणार अशी चिंता लागून राहिली होती. ' वैतरणा' त पण थोडा प्रतिकार झाला पण आधीचा लढाईचा अनुभव गाठीशी असल्याने आमची फत्ते झाली. सफळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, भोईसर, बाणगाव, डहाणू रोड सर करून ते घोडदळ आमच्यात सामावून घेतलं इथले नव्या दमाचे घोडे रथाला जोडून घेतले आणी रथाचा वेग वाढवला. थोड्याच वेळात रथ ऐन भरात आला आणी अंगात वारं शिरल्यागत सुसाट पळू लागला. घोलवड, उम्रगाव, संगाला, भिलाड, करम्बेले या ठिकाणी अजिबात प्रतिकार झाला नाही. इथल्या छोट्या मोठ्या जमीनदारांनी सरळ आत्मसमर्पण केले आणी पावणेसातला वापीला आलो. मिनिटाभरात वापी सर झालं आणी रथ पुन्हा पळू लागला. बगवाडा, उदवाडा, पारडी, सर केल्यावर 'अतुल' ह्या ठिकाणी थोडा प्रतिकार सहन करावा लागला. विजयाची चटक लागल्यामुळे हा प्रतिकार लवकरच मोडून काढला आणी सव्वासातच्या सुमारास वलसाड आलं.
दुसरा हल्ला झाला. आम्ही तयारीतच होतो, यावेळेस मी पण युद्धात भाग घेतला. अर्ध्या तासाच्या तुंबळ लढाईनंतर त्या सिग्नलरुपी शत्रूला हरवण्यात यश आलं आणी रथ पुढे निघाला. इतक्या कडव्या प्रतिकाराची अपेक्षा नसल्याने वेळापत्रकानुसार जवळपास दीड तास उशीर झाला होता. शत्रूला आम्ही नीट ओळखलच नव्हतं.
शिलेदार सावंत काही नव्या प्रकारची शस्त्रास्त्रे घेवून आले. त्यांनी ती शस्त्रे कशी वापरायची त्याचं एक प्रात्यक्षिक करून दाखवलं. ' चार्जेबल बेटरी' हि पहिली पिस्तुल होती. आपण हातानेच तिला चार्ज करून त्याच्या प्रकाशाचा मारा शत्रूवर करता येतो. बेटरीरुपी काडतुसे टाकण्याची यात गरज पडत नाही. 'साडी फोल्डर' नामक छोटीशी तोफ आणी 'शर्ट फोल्डर' नावाची दुसरी एक तोफ त्यांनी सर्वाना वाटली. छोटी टिपण करण्यासाठीची डायरी, पेन ई. वस्तूंचे वाटप करण्यात येत होते. डोक्यावर 'टोपी' नामक एक शिरस्त्राण देण्यात आलं. थोडक्यात लढाईची जय्यत तयारी झाली.एक छोटसं फोल्डर पण देण्यात आलं,यात टूथपेस्ट, ब्रश, साबण, दाढीसामान असे छोटे मोठे दारुगोळे ठेवता येतात.हि सर्व शस्त्रात्रे आम्ही एका पिशवीत भरून ठेवली.
रथ सुरु झाल्यापासून अगदी नियम असल्याप्रमाणे आम्ही चरण्यास सुरुवात केली. सोबत ब
ऱ्यापैकी रसद आणली होती तिचा वापर करण्यात येत होता. अधूनमधून स्टेशनवर उतरून गरम थंड बटाटवडे, भजी वगेरे काहीबाही वस्तू रिचवल्या जात होत्या.चहाचे पेल्यावर पेले रिकामे होत होते. अनेक होन मोजले जात होते, बरेच दिनार खर्च होत होते. 'सोन्याची नाणी' खणखणत होती.
७.४० ची घटका पूर्ण होत आली होती, वलसाड पडलं होतं, पुढच लक्ष्य होतं.... 'सुरत'.आम्ही अमलसाड , वेछडा, नवसारी, मरोळी काबीज करत 'उधनी जं.'च्या वेशीवर धडकलो. जोरदार आक्रमण झालं, तलवारी पुन्हा म्यानातून बाहेर आल्या. खडाजंगी झाली आणी वाजत गाजत उधनीत प्रवेश केला. पावणेआठला सुरतवर आक्रमण केलं, काही मिनिटातच सुरत लुटून पुढे निघालो. किम, कोसंबा अश्या छोट्या मोठा गावांकडे दुर्लक्ष्य केलं, आता मोठी मोठी शहरं घ्यायची होती. पुढे वडोदरा संस्थान होतं. सव्वाअकरापर्यंत ते येण्याची शक्यता होती.
मी रथात फिरून नुकसानीचा अंदाज घेतला. कोण किती जखमी, अथवा
मूर्छित होताहेत त्याचा आढावा घेतला. लोक हळूहळू आडवे होत होते आणी आमच संख्याबळ कमी होत होतं. परत येवून मी ब्रेड, अमूल बटर, चटणी असा रात्रीचा अल्पोपहार केला. लोक जखमी होवून धारातीर्थी पडत होते, दमून जखमी होवून बेशुद्ध होत होते.
आनंद, नडीयार, अहमदाबाद, कलोल, मेहसाणा, पालनपूर, अबूरोड, सिरोही, जवाई बंद, ई संस्थाने बाकी होती आणी आमच संख्याबळ रोडावत चालल होतं. ह्या सर्व ठिकाणी रात्रीत हल्ला होणार असल्याने तसा खास प्रतिकार होणार नव्हता. त्यामूळे सर्व महत्वाच्या शिलेदारांना आराम देवून नुसत्या पायदळावर लढाई जिंकण्याच ठरवून मी सुद्धा आडवं व्ह्यायच ठरवलं.
आमचे बरेचसे शिलेदार 'एस १' या डब्यात होते, आणी थोडे 'एस २' त, आम्ही 'एस ४' मध्ये होतो, बाकी उरलेले 'एस८' , 'एस१०' , असे विखुरलेले होते. नाही म्हणायला, सर्वजण मिळून एकूण १७१ सैनिक होते.
'टी सी' नावाचे बॉम्बगोळे अधूनमधून पडत होते आणी आम्ही समर्थपणे त्याला सामोरे जात होतो. खरा तर इतका मोठा ग्रुप असल्यानंतर चेकिंग करायची तशी गरज नसते कारण सर्वांकडे तिकिटं असतातच, पण त्याना कदाचित अस वाटत असाव की येवढा मोठा ग्रुप आहे एखाददुसरा बिना तिकिटाचा आत घुसवतील आणी आयताच बकरा मिळेल. साडेअकराला मी पण
मूर्छित झालो. आमचा रथ लपतछपत काळोखातून चालला होता, शत्रूच्या नजरा चुकवत... तात्पुरती युद्धबंदी जाहीर झाली.
सकाळी शुद्धीवर आलो. रथ बराच पुढे निघून आला होता. खेतवानी चहाच्या आशेवर रथाच्या दारावर उभा होता. अचानक माझ्या लक्ष्यात आलं की आपण रथावर झेंडाच लावलेला नाही. मी गडबडीत उठलो आणी ' पिवळा ' झेंडा फडकावून आलो. माझ्या आधी त्यासाठी बरेच जण रांग लावून होते. मी रथात सगळीकडे फिरून रिकामी जागा शोधली आणी झेंडा फडकावलाच, तेंव्हा कुठे खरं समाधान मिळालं. चहा नाश्ता झाल्यावर पुन्हा दुसरा झेंडा फडकवू, अस मनात म्हटलं.
युद्धाच रणशिंग पुन्हा फूंकलं,
सकाळी साडेसातला 'फालना' इथे लढाईला तोंड फुटलं. धूमश्चक्री झाली, फालना पडलं. पावणेआठला 'खिमेल' सर करून आठला 'राणी' घेतलं. सव्वाआठला 'सोमेश्वर' तर पावणेनऊपर्यंत भिवालीया, आवूआ, मारवाड हाती आलं. राजकीयवास, बोमादडला तर प्रतिकारच झाला नाही. साडेनऊला 'पाली' सर झालं. पिलथूदेगाड, खांडी, लुनी, भगत की कोठी, करत पावणेआठच्या सुमारास जोधपुरला पूर्ण युद्धबंदी जाहीर केली. तलवारी म्यान झाल्या. तोफा थंडावल्या, रथ थांबला. आम्ही पडाव टाकला. तळ ठोकला. शामियाने उभारले. आमच अंतिम लक्ष दृष्ठीपथात आलं होतं. आता पुढचे २ दिवस आम्ही जोधपुर पादाक्रांत करणार होतो.

रविवार, ७ मार्च, २०१०

माझे लहानपणाचे छंद

" बाळ तुला काय आवडत ? मोठेपणी कोण होणार ? " ह्या प्रश्नाने मला लहानपणी खुप छळलं आहे. एकदा तर " पोलीस " अस उत्तर दिल्याने लहानपणी मार मिळालेला आठवतोय. म्हणे कि काय " निदान ईनस्पेक्टर तरी म्हणायचं, पोलीस काय, दळभद्री कार्ट ". तस ह्या प्रश्नाने मोठेपणी पण माझा पिच्छा सोडलेला नाही. " व्हाट्स यूर होबी ? " असा प्रश्न आला की मी विचारात पडतो. आधी शाळेत निबंध लिहावा लागे आणी आता तोंडाने सांगावं लागतय. काय तर म्हणे 'माझा छंद' या विषयावर विस ओळी निबंध लिहा.... आता काय सांगावे बरे ? मला हा प्रश्न पडण्याच कारण म्हणजे, मला एक छंद असेल तर शपथ. माझे अनेक छंद होते कारण ते चालू व्हायचे आणी पाठोपाठ संपायचे देखील. मी लहानपणी केलेल्या त्या चाळ्याना छंद म्हणणे जरा अतिशयोक्ती होईल पण तरीही चाळा हा शब्द पण जरा जास्तच "डाऊन मार्केट" आहे म्हणून छंद.
रेल्वेची तिकिटे गोळा करणे हा छंद त्यातल्यात्यात जरा जास्त दिवस टिकलेला. मुंबई आणी लोकल ट्रेन अस समीकरण माझ्या जन्मापासूनच मनावर ठसलेलं. येणारया जाणाऱ्यांकडे मी तिकिटं मागायचो. आधी थोडं कौतुक झालं पण नंतर लोकं मला टाळू लागली. त्यांच्याकडचं रिटर्न तिकीट ते मला कसे देतील बरे. माझा हट्ट आपला चालूच. " अरे बाबा, मला परत जायचं आहे तेंव्हा लागेल ना रे तिकीट ", " पोलीस पकडतील ना रे मला, जेल मध्ये टाकतील नं ", अश्या अनेक फुटकळ कारणांचा माझ्यावर मात्र काही परिणाम व्हायचा नाही. खर तर, नाही म्हणायला परिणाम झाला, पण घरी येणारया पाहुण्यांच्या संख्येत. त्रास न होता, उलटा असा फायदा झाल्याने घरून पण ह्या छंदाला छुपा पाठींबा असायचा. काही पाहुणे तर इतके इरसाल होते कि ते माझ्यासाठी स्वतःच तिकिटं जमावायाचे. ती जुनी तिकिटं मला देवून आपलं रिटर्न तिकीट वाचवायचे. बरीच तिकीट गोळा झाल्यावर माझ्या मनाचं समाधान झालं. पुढे त्या तिकिटांनां वाळवी लागली आणी ती माझी मेहनत कचरयाच्या हवाली झाली.
सायकल चालवणे हा दुसरा जास्त दिवस टिकलेला खेळ अथवा छंद म्हणता येईल. व्यायाम प्रकार मला जास्त कधी रुचले नाहीत, कुणा बॉडी बिल्डर ची बॉडी पाहिली की अंग मेहनतीला सुरवात करायची, आणी आठवड्या भरात त्याच भूत उतरलं की पुन्हा येरे माझ्या मागल्या. सायकल च्या निमित्ताने थोडा व्यायाम व्हायचा. भाड्याच्या सायकलीला, ऑइल, ग्रीस वगेरे वंगण लावणं त्या 'चंदन सायकल मार्ट' वाल्याच्या इभ्रतीला शोभणारं नसल्याने जरा जास्तीचाच व्यायाम व्हायचा. स्वत ची सायकल येण्यास १० वी त चांगले मार्क्स काढावे लागले. त्या आधी भाड्याची सायकल चालवून हा छंद पूर्ण करावा लागे. भाडं म्हटलं की पैसे आले, घरापासून हाकेच्या अंतरावर शाळा असल्याने 'पॉकेट मनी' असा कधी मिळत नसे. मोठीआई कधी घरी आली की ती गपचूप पैसे देत असे. मग माझं सायकल प्रेम उफाळून येई. पन्नास पैसे अर्धा तास असा हिशेब होता, मिळालेले पैसे पुरवून पुरवून वापरावे लागत. त्यासाठी चोकलेट, चिंचा, बोरं, बर्फाचा गोळा इत्यादी गोष्टींचा काळजावर आणी जिभेवर दगड ठेवून त्याग करावा लागे.
वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे दगड गोळा करण्याला घरच्यांचा प्रचंड विरोध होता. चिकण मातीचे प्राणी बनवायचा छंद ते कोणते प्राणी आहेत ते आम्हालाच ओळखू न आल्याने बंद पडला. ह्याच प्रकारात मातीचा आंबा बनवण्याचा आणी त्याला पिवळ्या रंगात रंगवण्याचा असफल प्रयत्न केला होता. रंगपेटीतला सगळा पिवळा रंग त्या मातकट आंब्याने पिवून टाकला होता. पुढे मला नंतर ह्या पिवळ्या रंगासाठी वर्षभर वाट पहावी लागली होती आणी चित्र कलेच्या तासाला केळ्या - आंब्याच चित्र निळ्या रंगात रंगवावं लागलं होतं. तेंव्हा बाईंनी ते चित्र पूर्ण वर्गाला उंचावून दाखवलं होतं. शेवटी अश्या रीतीने माझा आणी चित्रकलेचा पण संपर्क तुटला तो कायमचा. बॉल बेअरिंग, छोटे मोठे गियर चे तुकडे जमवायचा पण प्रयत्न करून पाहिला. ते बॉल बेअरिंग सांभाळायचे म्हणजे तारेवरची कसरत होती. हातातून एखादा चुकून पडला कि असा पळायचा की त्या मुंबईच्या, फर्निचर ने गच्च भरलेल्या, १० बाय ८ च्या खोलीत शोधाशोध करण्यात नाकीनऊ यायचे. शिकवण्या घेण्याची हौस कुणी मुलं न आल्याने, प्लास्टिकचे प्राणी, काचेच्या रिकाम्या बाटल्या वगेरे जमवून, त्याना शिकवून पूर्ण केली. निदान त्या अनुषंगाने आपल्या मुलाचा अभ्यास होतोय हे पाहून ह्या छंदाला घरून पण पूर्ण परवानगी होती. उलट एक काळा फळा मम्मीनेच आणून दिला होता. भिंती खराब होवू नयेत हि छुपी इच्छा त्या मागे होती हे काही सांगायला नको. चाचा चौधरी, साबू, चिंगी, फास्टर फेणे, बोक्या सातबंडे, वगेरे प्राण्यांनी माझा बराच पॉकेटमनी आणी वेळ खर्च केला होता. जीभ व पोट जास्त प्रिय असल्याने आणी पुस्तक वाचण्यासाठी मागच्या बाकांवर बसून अभ्यासाची बोंब केल्याने ते बंद करायची धमकीवजा सूचना पाळावीच लागली. पिंपळाच्या झाडाचं पान पुस्तकात ठेवून त्याची जाळी होईपर्यंत वाट बघावी लागे. त्यावर मग एक जालीम उपाय काढला होता. ते पान, दोन तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवायचं आणी मग ब्रश ने ते घासून त्यावरचे कुजलेले हरित कण काढून टाकायचे आणी मस्त जाळी तयार करायची. मग पुढे पुढे गैलरीत जास्तच कुजका वास यायला लागल्यावर हे प्रकार बंद झाले. जेवणाचे वेगवेगळे पदार्थ पाककृतीच्या पुस्तकात पाहून बनवणे असा छंद जोपासण्याचा यत्न केला पण हाताला चटके मिळाल्यावर भाकर बनवणे बंद झाले. पोस्टाची तिकीट गोळा करण्याच्या छंदावर ईमेल ने पाणी फिरवलं. फोटोग्राफीचा नाद नवा केमेरा जुना होईपर्यंतच टिकला. ह्या छंदाची सेवा करत असताना हातातून जमिनीवर पडून त्याचे तीन तेरा वाजल्यावर हा छंद पण इतिहास जमा झाला. पुढे ह्याच प्रकारात २५ हजाराचा सोनी हँडीकँम मेमरी फुल होई पर्यंतच वापरला गेला आणी आता धूळ खात कपाटात मूकपणे दिवस मोजतो आहे. डायरी लिहिण्याचा प्रकार मी गेले कित्येक वर्ष करत आहे पण नवीन डायरीच्या मार्च महिन्यानंतरच्या महिन्यांनी शाईची चव कधी पाहिली नाही.
शेवटी आजकाल मी मला झोपण्याचा, खाण्याचा आणी टी व्ही पहाण्याचा छंद आहे असं सांगतो म्हणजे छंदापरी छंद आणी बंद व्हायची काळजी नाही. हा छंद मात्र कायम स्वरूपी माझ्या सोबत रहाणार आहे.

शनिवार, २६ डिसेंबर, २००९

प्रयागच्या फ़ँक्टरीत जायला मिळणार म्हणून साखरेला खुप आनंद झाला. ह्याच दिवसाची ती खुप आतुरतेने वाट पाहत होती. लहान मुले साखरेला खुपच प्रिय होती आणी आता तर तिला लहान मुलांची ओढ़ लागली होती. बेळगावच्या " रेणुका शुगर"च्या कारखान्यात स्वच्छ आंघोळ करून, पांढऱ्या रंगाची साडी नेसून, गोणपाटात स्वतःला सजवून ती प्रवासाला निघाली. या कारखान्यातुन प्रवासाला निघण्याची साखरेची ही काही पहिली वेळ नव्हती, या आधी सुद्धा कधी कुणाच्या चहात, खीरित, गोड़ी निर्माण करायला तिला धडपड़ाव लागत असे. तिला पण लोकांच्या आयुष्यात गोड़ी निर्माण करायला खुप आवडत असे.अस असलं तरीपण आज प्रयागची गोष्टच काही वेगळी होती. इथ येण्यासाठी साखर नेहमी आसुसलेली असे.
तिन दिवसांच्या प्रवासांनंतर प्रयागच्या आवारात एक ट्रक आला होता. इथे असणाऱ्या हमाल लोकांनी आपल्या डोक्यांवरचे फेटे काढून,शर्टाच्या बाह्या वर सरसावत साखरेच जंगी स्वागत केलं. तिच्या बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेचा अंत झाला होता म्हणून साखर खुप खुश होती.नाचत गात हमाल लोकांच्या खान्द्यावरून ती गोडाउनकड़े निघाली. तिच्या खुशीच आणखी एक कारण होतं. तिचा जीवाभावाचा मित्र तिला इथेच भेटणार होता,तो म्हणजे " लिक्विड ग्लुकोझ ".त्याचे आणी साखरेचे प्रेमाचे किस्से जगभरात मशहूर होते. ' लिक्विड ग्लुकोझ' ला ती प्रेमाने ' एल जी' म्हणत असे. हा एल जी दिसायला खुप गोंडस होता. तशी साखरे इतकी गोड़ी त्याला नसली तरी स्वभावाने खुपसाधा होता. कधी कुणाला दुखावायचा नाही, त्याचं सर्वांबरोबर पटत असे. त्याच्या ह्याच स्वभावावर तर साखर भाळली होती. 'एल जी' ला पण साखरेच्या आगमनाची चाहुल लागली होती. ' बटर' ने ' वनस्पति तुपा'ला तसं सांगताना एल जी ने गपचूप ऐकलं होतं. तोही खुप उत्सुक होता. एका छोट्या मुंगीला त्याने बोलावलं आणी साखरेला एक चिठ्ठी पाठवली. तस प्रयागच्या आवारात खर तर मुंगीलाही शिरायला वाव नव्हता पण ह्या मुंगीला त्याने आपल्याकड़े असणाऱ्या गोड रसाची लालूच दाखवली होती. प्रयागमध्ये शिरण अवघड होतं पण तरीही त्या मुंगीने एका रात्री धाडस केलं आणी ती एका छोट्या भोकातून जीव मुठीत घेवुन आत शिरली. साखरेला चिठ्ठी वाचून इतका आनंद झाला की तिने आपल्या गळ्यातला साखरहार काढून मुंगीला बहाल केला.साखरेचा प्रिय सखा 'एल जी' तिला लवकरच भेटणार होता. सोमवारी सकाळी सहाला त्याने तिला "रियाक्टर" बागेत बोलावलं होतं. साखरेला आता त्या दिवसाची ओढ़ लागुन राहिली होती.
सोमवारची सकाळ उजाडली. साखर तयार होवून निघाली त्या रियाक्टरकड़े. बागेत शिरताच मात्र तिला 'पाणी' दिसलं. हे 'पाणी' तीथ आधीच येवून थांबलं होतं. पाण्याच तीथ येणं साखरेला अजिबात आवडल नाही.अगोदरच पाणी आणी साखरेचा छत्तीसाचा आकडा. त्यात हे पाणी एकदम धूर्त होतं. साखरेविषयी काही बाही सांगुन एल जी च्या मनात ते सारखं विष कालवत असे. गोड गोड बोलून कुणालाही वश करण्यात त्याचा हातखंडा होता. एल जी आणी पाणी प्रयागमध्ये एकत्र रहात असत. एल जी ला पाण्याचा हा स्वभाव माहीत होता,पण काय करणार त्याचा नाईलाज होता. आल्या आल्या पाण्याने साखरेवर जाळं टाकायला सुरवात केली. एल जी बद्दल कागाळी करायला सुरुवात केली. त्याने साखरेचं इतकं डोकं फिरवलं की एल जी आल्यावर साखरेने त्याच्यावर आगपाखड करायला सुरुवात केली. वातावरण तापू लागलं. पाण्याने मात्र आता सरडयासारखा रंग बदलला. हा पाण्याचा आणखीन एक गुणधर्म होता. जशी परिस्थिति असेल तस ते वागायचं,जसं भांड असेल तसा आकार घ्यायचं. कुठल्याही रंगात रंगत असे. इकडची गोष्ट तिकडे करणे, दुसर्यांचे कान भरणे, यात त्याचा हातखंडा होता. 'एल जी'ची बाजू घेवुन त्याने साखरेला एकटं पाडलं. तपमान ८० डिग्री पर्यंत वाढलं. साखर काही हार मानायला तयार नव्हती. 'सोडियम सिट्रेट', 'फ्रूट पावडर' वगेरे मंडळींनी शांतता राखण्याचा खुप प्रयत्न केला. पण तिघेही इरेला पेटले होते. आतापर्यंत साखरेला कळून चुकलं होतं की पाणीच या कलहाला कारणीभुत आहे, तिने आपला मोर्चा आता पाण्याकड़े वळवला, 'एल जी'च्या पण आता लक्षात आलं की पाण्यानेच हे सगळ घडवून आणलं आहे. वातावरण तापत चाललं होतं. 'एल जी'ने पण साखरेची बाजू घेतली. तापमान १४३ डिग्री पर्यंत वाढलं. दोघांना एकत्र झालेलं पाहून पाणी भांबावून गेलं. पळ काढण्याशिवाय त्याच्यासमोर काही पर्याय राहिला नव्हता. पाण्याच्या निघून जाण्याने शांतता झाली. साखरेने एल जी कड़े हळूच पाहिलं आणी नजरेनेच माफ़ी मागितली. एल जी गालातल्या गालात हसला. दोघांच्या आयुष्याला नवी दिशा मिळणार होती. दोघे एकमेकांकडे बराच वेळ पाहत राहिले. मग साखरेने 'एल जी'च्या कानात तिची इच्छा सांगितली. त्यालाही ती कल्पना खुप आवडली. त्यासाठी त्यांना एल जी च्या एका मित्राची म्हणजे डॉ.'सिट्रिक अँसीड'ची मदत होणार होती. दोघे त्याच्याकड़े गेले. लहान मुलांकडे छोट्या छोट्या गोळ्यांच्या रुपात जाण्याचा विचार ऐकुन डॉ.सिट्रिक अँसीड तयार झाला. त्याला पण लहान मुले खुप आवडत. पाण्याबरोबरच्या भांडणामुळे ह्या दोघांच्या संसारात एक आंबटगोड चव निर्माण झाली होती. पण आता मात्र त्यांच्या प्रेमाचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला होता. मग डॉ.'सिट्रिक अँसीड'च्या मदतीने ह्या दोघांनी अनेक छोट्या छोट्या गोळ्यांन्ना जन्म दिला. आपल्या असंख्य मुलांना पाहून, साखर आणी 'एल जी'ला खुप आनंद झाला. त्यानी मग सर्वांसाठी प्लास्टिक ल्यँमीनेटचे रंगेबिरंगी छान छान कपड़े घेतले. प्रत्येकाला हे कपड़े घालून बाजारात रवाना केलं. 'नटखट मँगो' , 'वाईल्ड बनाना', 'मँगो डीलाईट', ऑरेंज जोश', 'पाइनापल पंच' , वगेरे नावाने ' कँडीमँन ' चं साम्राज्य निर्माण केलं. या गोळ्यांच्या रुपात लहान मुलांकडे जाण्याचं साखरेच स्वप्न आता पूर्ण होणार होतं.
एका पानवाल्याच्या दुकानात लहान मुलांच्या प्रतिक्षेत किती वेळ गेला ते "कँडीमँन" नावाच्या पेपरमिंटच्या गोळीला लं नाही. दुरून दोन मुलं येताना पाहून ती खुश झाली. आज आपल्या आई बाबांच स्वप्न पूर्ण होणार म्हणून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्या मुलांनी गोळ्यांच्या डब्यावरून एक नजर फिरवली आणी "कँडीमँन" पेपरमिंटच्या गोळीकडे बोट दाखवलं. दोन रुपये त्या दुकानदाराच्या हातावर टेकवून चार गोळ्या घेवून ती मुले शाळेकडे निघाली. त्यांच्या मुठीतली ती गोळी स्वतःला धन्य समजत होती. तोंडात शिरताच तिच्यातली साखर विरघळू लागली आणी त्या मुलांच्या तोंडावर एक प्रकारचं समाधान दिसू लागलं. ह्याच दिवसासाठी साखरेने एवढा खटाटोप केला होता. आज ती खुप खुश होती. लहान मुलांच्या जीवनात तिने गोड़ी निर्माण केली होती आणी आज तिच्या आयुष्याचं सार्थक झालं होतं.