जोधपुर प्रयाण / युद्धमोहिम जोधपुरपर्यंतची...
गेल्या वर्षीच्या दक्षिण भारताच्या यशस्वी मोहिमेनंतर आता आम्ही आमचा मोर्चा उत्तर पश्चिम भारताकडे वळवला. राणे महाराजांच्या नेतृत्वाखालील " वैष्णोदेवी मित्र मंडळ " च्या झेंड्याखाली एकत्र येवून, उत्तर भारत काबीज करण्याच्या मोहिमेची आखणी बऱ्याच दिवसापासून चालली होती. याआधी ३ महिन्यांपूर्वी बेंगलोर, हैदराबाद, गोवा अशी राज्ये काबीज केल्यानंतर आता राजस्थान, जम्मू आणी त्यानंतर थेट दिल्ली काबीज करण्यासाठी घरातल्या देवांच्या साक्षीने प्रस्थान केलं.
बांद्रा रेल्वे टर्मिनल्स हा पहिला पडाव होता. त्यासाठी सुमो नामक एक घोडा ठरवला होता.हा आम्हास घेवून बांद्र्यास सोडणार होता. दुपारी ठीक ३ च्या घटकेस आम्हास तेथे पोहचायचे होते.सर्व युद्धास लागणारी सामग्री काल पासूनच तयार ठेवली होती. तब्बल पाच तोफा सज्ज होत्या. कपडे, सामान सदृश्य दारुगोळा त्यात ठासून भरला होता. खाण्यापिण्याची भरपूर रसद बरोबर घेतली होती. न जाणो कोण्या शत्रूने आमची रसद अडवली तर.... निदान काही दिवसांची तरी सोय आपल्याबरोबर असावी...
"आम्ही घोडे घेवून तूर्तास निघत आहोत ", शिलेदार जोशी यांचा संदेश ' मोबाइल ' नामक राजदुताद्वारे मिळाला. आम्ही आमच्या तोफा किल्ल्यातून बाहेर काढल्या आणी किल्याच्या राजद्वारापाशी घोड्याची वाट पहात थांबलो. थोड्याच वेळात शिलेदार जोशी आम्हास येवून मिळाले. त्या सुमो नामक घोड्यास एक टाच मारून ' डोंबिवली पश्चिमे' कडे कूच केले. मोकाशींच्या तोफांचा ताफा आम्हास येवून मिळाला. रस्त्यातच पुढे ' सिंग ' नावाच्या शिलेदारास सोबत घेतले आणी आमच घोडे बेफाम दौडू लागले. ' इस्टर्न एक्सप्रेस हायवे ' या राजपथावरून दौडत निघालो. वेळेच्या आधी अर्धा तास पोहचलो. वजनाने जड असणाऱ्या तोफा चालवत आम्ही स्टेशन वर येवून तळ ठोकला. थोड्याच वेळात 'रणकपूर एक्सप्रेस' नामक रथात आरूढ झालो. या रथाला बरेच नव्या दमाचे घोडे जोडलेले होते. रथाचा सारथी ठीक सव्वातीनच्या घटकेला रथ चालू करणार होता. इथ अनेक ठिकाणाहून आलेले राजे रजवाडे, शिलेदार, किल्लेदार, सुभेदार, आम्हास येवून मिळाले. आतापर्यंत आमच सैन्य बरच मोठ झालं होतं. ह्या सर्वांना राणेनी एकत्र केलं आणी रथात बसायच्या जागा समजावून सांगितल्या. एस फोर च्या ४,५,व ६ या जागा आमच्यासाठी राखीव होत्या आणी आम्ही आसनस्थ झालो. तोफा बैठकीखाली लपवून ठेवल्या. रस्त्यात शत्रूने जर गाठलच तर त्याला आमच्या शक्तीची कल्पना येवू नये. ठीक सव्वातीन ला रथ हलला, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली करत बोरिवलीला थांबला. इथे आणखीन काही शिलेदार चढणार होते. 'खेतवानी' इथ त्याच्या तीन तोफा घेवून चढला. आसनाखाली जागा नसल्याने त्याने वरच्या आसनावर त्याच्या तोफा ठेवल्या. आम्ही एकमेकांना हस्तालोन्दन केलं आणी पुढील हल्ल्याची आखणी केली. पावणेचारला रथ पुन्हा दौडत निघाला. दहीसर, मिरारोड, भायींदर, नायगाव, वसई रोड करत सव्वाचारला विरार आलं. आतापर्यंत आम्ही आमच्या हद्दीतून बाहेर आलो होतो आणी अनोळखी प्रदेश इथून सुरु होणार होता.
थोड्याच वेळात कळलं की आमच्यावर हल्ला झाला होता. शत्रूने नकळत आमच्यावर हल्लाबोल केला आणी नव्या प्रदेशात शिरताच आमचा रथ अडवला. आम्ही सर्व सैनिक, लढाईला अचानक तोंड फुटल्याने भांबावून गेलो. सर्व शिलेशिपाई खाली उतरले आणी तुंबळ युद्ध केलं. तब्बल तासभर लढाई चालली. त्या 'सिग्नल' रुपी शत्रूने आम्हाला चांगलीच टक्कर दिली. चिवट प्रतिकारानंतर अखेर आमची सरशी झाली आणी आम्ही आमचा रथ पुढे दामटला. पहिल्याच हल्याने खूप नुकसान केलं होतं. आमचे घोडे जखमी झाले होते. रथाचा वेग मंदावला होता. हा असाच वेग राहिला तर पुढे कसं होणार अशी चिंता लागून राहिली होती. ' वैतरणा' त पण थोडा प्रतिकार झाला पण आधीचा लढाईचा अनुभव गाठीशी असल्याने आमची फत्ते झाली. सफळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, भोईसर, बाणगाव, डहाणू रोड सर करून ते घोडदळ आमच्यात सामावून घेतलं इथले नव्या दमाचे घोडे रथाला जोडून घेतले आणी रथाचा वेग वाढवला. थोड्याच वेळात रथ ऐन भरात आला आणी अंगात वारं शिरल्यागत सुसाट पळू लागला. घोलवड, उम्रगाव, संगाला, भिलाड, करम्बेले या ठिकाणी अजिबात प्रतिकार झाला नाही. इथल्या छोट्या मोठ्या जमीनदारांनी सरळ आत्मसमर्पण केले आणी पावणेसातला वापीला आलो. मिनिटाभरात वापी सर झालं आणी रथ पुन्हा पळू लागला. बगवाडा, उदवाडा, पारडी, सर केल्यावर 'अतुल' ह्या ठिकाणी थोडा प्रतिकार सहन करावा लागला. विजयाची चटक लागल्यामुळे हा प्रतिकार लवकरच मोडून काढला आणी सव्वासातच्या सुमारास वलसाड आलं.
दुसरा हल्ला झाला. आम्ही तयारीतच होतो, यावेळेस मी पण युद्धात भाग घेतला. अर्ध्या तासाच्या तुंबळ लढाईनंतर त्या सिग्नलरुपी शत्रूला हरवण्यात यश आलं आणी रथ पुढे निघाला. इतक्या कडव्या प्रतिकाराची अपेक्षा नसल्याने वेळापत्रकानुसार जवळपास दीड तास उशीर झाला होता. शत्रूला आम्ही नीट ओळखलच नव्हतं.
शिलेदार सावंत काही नव्या प्रकारची शस्त्रास्त्रे घेवून आले. त्यांनी ती शस्त्रे कशी वापरायची त्याचं एक प्रात्यक्षिक करून दाखवलं. ' चार्जेबल बेटरी' हि पहिली पिस्तुल होती. आपण हातानेच तिला चार्ज करून त्याच्या प्रकाशाचा मारा शत्रूवर करता येतो. बेटरीरुपी काडतुसे टाकण्याची यात गरज पडत नाही. 'साडी फोल्डर' नामक छोटीशी तोफ आणी 'शर्ट फोल्डर' नावाची दुसरी एक तोफ त्यांनी सर्वाना वाटली. छोटी टिपण करण्यासाठीची डायरी, पेन ई. वस्तूंचे वाटप करण्यात येत होते. डोक्यावर 'टोपी' नामक एक शिरस्त्राण देण्यात आलं. थोडक्यात लढाईची जय्यत तयारी झाली.एक छोटसं फोल्डर पण देण्यात आलं,यात टूथपेस्ट, ब्रश, साबण, दाढीसामान असे छोटे मोठे दारुगोळे ठेवता येतात.हि सर्व शस्त्रात्रे आम्ही एका पिशवीत भरून ठेवली.
रथ सुरु झाल्यापासून अगदी नियम असल्याप्रमाणे आम्ही चरण्यास सुरुवात केली. सोबत बऱ्यापैकी रसद आणली होती तिचा वापर करण्यात येत होता. अधूनमधून स्टेशनवर उतरून गरम थंड बटाटवडे, भजी वगेरे काहीबाही वस्तू रिचवल्या जात होत्या.चहाचे पेल्यावर पेले रिकामे होत होते. अनेक होन मोजले जात होते, बरेच दिनार खर्च होत होते. 'सोन्याची नाणी' खणखणत होती.
७.४० ची घटका पूर्ण होत आली होती, वलसाड पडलं होतं, पुढच लक्ष्य होतं.... 'सुरत'.आम्ही अमलसाड , वेछडा, नवसारी, मरोळी काबीज करत 'उधनी जं.'च्या वेशीवर धडकलो. जोरदार आक्रमण झालं, तलवारी पुन्हा म्यानातून बाहेर आल्या. खडाजंगी झाली आणी वाजत गाजत उधनीत प्रवेश केला. पावणेआठला सुरतवर आक्रमण केलं, काही मिनिटातच सुरत लुटून पुढे निघालो. किम, कोसंबा अश्या छोट्या मोठा गावांकडे दुर्लक्ष्य केलं, आता मोठी मोठी शहरं घ्यायची होती. पुढे वडोदरा संस्थान होतं. सव्वाअकरापर्यंत ते येण्याची शक्यता होती.
मी रथात फिरून नुकसानीचा अंदाज घेतला. कोण किती जखमी, अथवा मूर्छित होताहेत त्याचा आढावा घेतला. लोक हळूहळू आडवे होत होते आणी आमच संख्याबळ कमी होत होतं. परत येवून मी ब्रेड, अमूल बटर, चटणी असा रात्रीचा अल्पोपहार केला. लोक जखमी होवून धारातीर्थी पडत होते, दमून जखमी होवून बेशुद्ध होत होते.
आनंद, नडीयार, अहमदाबाद, कलोल, मेहसाणा, पालनपूर, अबूरोड, सिरोही, जवाई बंद, ई संस्थाने बाकी होती आणी आमच संख्याबळ रोडावत चालल होतं. ह्या सर्व ठिकाणी रात्रीत हल्ला होणार असल्याने तसा खास प्रतिकार होणार नव्हता. त्यामूळे सर्व महत्वाच्या शिलेदारांना आराम देवून नुसत्या पायदळावर लढाई जिंकण्याच ठरवून मी सुद्धा आडवं व्ह्यायच ठरवलं.
आमचे बरेचसे शिलेदार 'एस १' या डब्यात होते, आणी थोडे 'एस २' त, आम्ही 'एस ४' मध्ये होतो, बाकी उरलेले 'एस८' , 'एस१०' , असे विखुरलेले होते. नाही म्हणायला, सर्वजण मिळून एकूण १७१ सैनिक होते.
'टी सी' नावाचे बॉम्बगोळे अधूनमधून पडत होते आणी आम्ही समर्थपणे त्याला सामोरे जात होतो. खरा तर इतका मोठा ग्रुप असल्यानंतर चेकिंग करायची तशी गरज नसते कारण सर्वांकडे तिकिटं असतातच, पण त्याना कदाचित अस वाटत असाव की येवढा मोठा ग्रुप आहे एखाददुसरा बिना तिकिटाचा आत घुसवतील आणी आयताच बकरा मिळेल. साडेअकराला मी पण मूर्छित झालो. आमचा रथ लपतछपत काळोखातून चालला होता, शत्रूच्या नजरा चुकवत... तात्पुरती युद्धबंदी जाहीर झाली.
सकाळी शुद्धीवर आलो. रथ बराच पुढे निघून आला होता. खेतवानी चहाच्या आशेवर रथाच्या दारावर उभा होता. अचानक माझ्या लक्ष्यात आलं की आपण रथावर झेंडाच लावलेला नाही. मी गडबडीत उठलो आणी ' पिवळा ' झेंडा फडकावून आलो. माझ्या आधी त्यासाठी बरेच जण रांग लावून होते. मी रथात सगळीकडे फिरून रिकामी जागा शोधली आणी झेंडा फडकावलाच, तेंव्हा कुठे खरं समाधान मिळालं. चहा नाश्ता झाल्यावर पुन्हा दुसरा झेंडा फडकवू, अस मनात म्हटलं.
युद्धाच रणशिंग पुन्हा फूंकलं, सकाळी साडेसातला 'फालना' इथे लढाईला तोंड फुटलं. धूमश्चक्री झाली, फालना पडलं. पावणेआठला 'खिमेल' सर करून आठला 'राणी' घेतलं. सव्वाआठला 'सोमेश्वर' तर पावणेनऊपर्यंत भिवालीया, आवूआ, मारवाड हाती आलं. राजकीयवास, बोमादडला तर प्रतिकारच झाला नाही. साडेनऊला 'पाली' सर झालं. पिलथूदेगाड, खांडी, लुनी, भगत की कोठी, करत पावणेआठच्या सुमारास जोधपुरला पूर्ण युद्धबंदी जाहीर केली. तलवारी म्यान झाल्या. तोफा थंडावल्या, रथ थांबला. आम्ही पडाव टाकला. तळ ठोकला. शामियाने उभारले. आमच अंतिम लक्ष दृष्ठीपथात आलं होतं. आता पुढचे २ दिवस आम्ही जोधपुर पादाक्रांत करणार होतो.
सोमवार, ५ एप्रिल, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा